महाराष्ट्राचा ओदिशावर २७ धावांनी विजय

ऋतुराज गायकवाडने (४७ चेंडूंत ८१ धावा) सलग तिसऱ्या अर्धशतकाची नोंद केल्यामुळे महाराष्ट्राने मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ-गटात ओदिशावर २७ धावांनी विजय मिळवला.

महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना २० षटकांत ८ बाद १८३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. ऋतुराजने केदार जाधवच्या (३५ चेंडूंत ५५ धावा) साथीने ओदिशाच्या गोलंदाजीवर आक्रमण करीत दुसऱ्या गड्यासाठी १३१ धावांची भागीदारी रचली. १५व्या षटकात ऋतुराज बाद झाल्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या अन्य फलंदाजांना धावांचा आलेख आणखी उंचावता आलेला नाही.

प्रत्युत्तरात ओदिशाचा डाव १८.५ षटकांत १५६ धावांत आटोपला. अंशाय रथने ३४ आणि अभिषेक राऊतने २९ धावांचे योगदान दिले. डावखुरा मध्यमगती गोलंदाज दिव्यांग हिंगणेकरने ३५ धावांत ४ बळी घेतले, तर आशय पालकरने १३ धावांत ३ बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : २० षटकांत ८ बाद १८३ (ऋतुराज गायकवाड ८१, केदार जाधव ५५; देवव्रत प्रधान ३/३७) विजयी वि. ओदिशा १८.५ षटकांत सर्व बाद १५६ (अंशाय रथने ३४  अभिषेक राऊत २९; दिव्यांग हिंगणेकर ४/३५, आशय पालकर ३/१३)

’  गुण : महाराष्ट्र ४, ओदिशा ०