मला देण्यात आलेला सामनावीर पुरस्कार खरंतर जसप्रीत बुमराहला द्यायला हवा असे उद्गार संजू सॅमसनने काढले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अत्यंत अटीतटीच्या मुकाबल्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. या लढतीत ४२ चेंडूत ८९ धावांची खेळी करणाऱ्या संजूला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. रविवारी ८ तारखेला अहमदाबाद इथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल मुकाबला होईल.
‘विजयाचं श्रेय जसप्रीत बुमराहला द्यायला हवं. दशकातून एकदाच असा गोलंदाज जन्माला येतो. मला देण्यात आलेला सामनावीर पुरस्कार खरंतर त्याला द्यायला हवा. त्याने शेवटच्या षटकांमध्ये टिच्चून मारा केला नसता तर मी या ठिकाणी हा पुरस्कार घेण्यासाठी नसतो’, असं सांगत संजूने मनाचा मोठेपणा दाखवला. पाचशेहून जास्त धावा झालेल्या सामन्यात बुमराहने ४ षटकात ३३ धावा देत एक विकेट पटकावली. स्लोअरवन आणि यॉर्करचा भेदक मारा करत बुमराहने इंग्लंडच्या धावगतीला वेसण घातली.
अर्धशतकाबद्दल विचारलं असता संजू म्हणाला, ‘वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मला सूर गवसला होता. तोच फॉर्म कायम राखत खेळण्याचं ठरवलं. चेंडू उशिराने खेळायचं ठरवलं. वानखेडे हे आकाराने छोटं मैदान आहे. इंग्लंडने टॉस जिंकून आम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यामुळे जास्तीत जास्त धावा करणं आवश्यक होतं. इंग्लंडने लक्ष्य गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. जेकब बेथेलने शतकी झुंज दिली. सेमी फायनलला साजेसा मुकाबला होता. खेळपट्टीचा नूर ओळखून फलंदाजी करणं आवश्यक होतं. वानखेडे मैदानावर भरपूर क्रिकेट खेळलो आहे. धावांचा पाठलाग करणं इथे सोपं होतं. मी आणि इशान फलंदाजी करत असताना धावा होऊ शकतात याची जाणीव झाली होती. ड्रेसिंगरुममध्येही आमचं हेच बोलणं झालं’.
‘तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ केला, त्यामुळेच जिंकू शकलो. शतक झालं नाही याचं शल्य नाही. टी२० हा अतिशय वेगवान प्रकार आहे. टेस्ट किंवा वनडेसारखा नाही. तुम्हाला डावाची आखणी करता येत नाही. जास्तीत जास्त धावा फटकावणे हेच उद्दिष्ट असतं. संघाच्या विजयात योगदान देऊ शकलो याचं अतीव समाधान आहे’, असं संजूने सांगितलं.
