‘दुखापतीमुळे मला मैदानाबाहेर जावं लागलं. मी ड्रेसिंगरुममधून सगळं पाहत होतो. माझ्या लहान भावांनी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला नमवत अशक्य ते शक्य करून दाखवलं’, अशा शब्दांत झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने आपल्या भावना व्यक्त केल्या. टी२० वर्ल्डकप स्पर्धेत शुक्रवारी झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली. या विजयामुळे बाद फेरीसाठी झिम्बाब्वेचं पारडं जड झालं आहे तर दुसरीकडे दुखापतींनी ग्रासलेला ऑस्ट्रेलियाचा संघ प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळण्याची चिन्हं आहेत.

‘मला क्रॅम्पचा त्रास झाला. त्यामुळे मैदानाबाहेर जावं लागलं. पुढच्या लढतीसाठी मी फिट होईन. ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाविरुद्ध जिंकल्याने प्रचंड आनंद झाला आहे. माझ्या भावांनी करून दाखवलं. मी मैदानाबाहेरून सगळं बघत होतो, संपूर्ण संघाने अफलातून खेळ करत हा विजय साकारला. आमची संस्कृती, संघातलं खेळीमेळीचं वातावरण आणि एकी यांचा हा विजय आहे. प्रत्येकजण एकमेकासाठी खेळतो आहे. संघभावना आहे’असं रझाने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.

खेळपट्टी आणि धावसंख्येबाबत विचारलं असता रझा म्हणाला, ‘आमच्या १० षटकात ७० धावा झाल्या होत्या. त्या समाधानकारक होत्या. १९० करायच्या आहेत असा विचार केला असता तर १४०ला ऑलआऊट झाला असता. आक्रमणावर भर दिला तर श्रीलंकेत फटका बसू शकतो हे आम्ही पाहिलं आहे. म्हणून आम्ही ब्रायन बेनेटला संदेश पाठवला की खेळपट्टीवर टिकून राहा. तो शेवटपर्यंत टिकून राहिला आणि आम्ही चांगली धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना गोलंदाजांनी जीव तोडून गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकांची साथ तर तुम्ही पाहिलीच आहे. अद्भुत असा हा विजय आहे’.

‘आम्ही या विजयासाठी आसुसलो होतो. एकाक्षणी आमच्याकडे तेराच फिट खेळाडू होते. मग मला त्रास होऊ लागला. ग्रीम क्रीमरच्या बोटांनाही लागलं होतं. पण आम्ही हार मानली नाही. बदली खेळाडू लवकरच संघात दाखल होतील. उष्ण आणि दमट वातावरणात खेळताना १५ फिट खेळाडू ताफ्यात असणं आवश्यक आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे केली. त्यामुळेच हा विजय मिळू शकला. गुणतालिकेत आम्ही चांगली आगेकूच केली आहे. पण उर्वरित सामने गृहित धरून चालणार नाहीत. पुढचा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे’, असं रझाने सांगितलं.

झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० प्रकारात १९ वर्षानंतर विजय

झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा दुसरा टी२० विजय आहे. याआधी १९ वर्षांपूर्वी २००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला नमवण्याची किमया केली होती. शुक्रवारी झालेल्या लढतीत झिम्बाब्वेने १६९ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियासाठी ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ या जोडीने भागीदारी करत डाव सावरला. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर रेनशॉवर सूत्रं होती. मात्र वाढत्या धावगतीचं दडपण रेनशॉवर आलं. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या.

सामन्यात काय झालं?

झिम्बाब्वेने ब्रायन बेनेटच्या अर्धशतकाच्या बळावर १६९ धावांची मजल मारली. बेनेट आणि ताडिवानाशे मारुमानी यांनी ६१ धावांची सलामी दिली. स्टॉइनसने मारुमानीला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३५ धावा केल्या. रायन बर्लने बेनेटला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५१ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली. बर्लला ग्रीनने बाद केलं. त्यानेही ३५ धावा केल्या. यानंतर बेनेटला सिकंदर रझाची साथ मिळाली. या जोडीने २४ चेंडूत ३८ धावा कुटल्या. बेनेटने ५६ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ६४ धावांची खेळी केली. बेनेटने सूत्रधाराची भूमिका स्वीकारत खेळी केली मात्र २० षटकं खेळूनही त्याच्या नावावर अर्धशतकच असल्याने स्ट्राईकवरून टीकाही झाली. त्याने ११४च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोश इंगलिस ८ धावा करून तंबूत परतला. मुझाराबानीने त्याला बाद केलं. कॅमेरुन ग्रीनला इव्हान्सने बाद केलं. तो भोपळाही फोडू शकला नाही. मुझाराबानीच्या उसळत्या चेंडूवर टीम डेव्हिड भोपळाही न फोडता तंबूत परतला. इव्हान्सने कर्णधार हेडला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाची अवस्था २९/४ अशी केली. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी पाचव्या विकेटसाठी ५९ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेल सामना जिंकून देणार असं चित्र असताना बर्लच्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने ३१ धावांची खेळी केली. दुखापतीमुळे गोलंदाजी अर्धवट सोडलेला मार्कस स्टॉइनस फलंदाजीला आला. चौकारासह त्याने चांगली सुरुवात केली. मात्र मासाकाटझाने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. स्टॉइनसने ६ धावा केल्या. बेन ड्वाशियॉसने लगावलेल्या फटक्याचं मुनयोंगाने अफलातून झेलात रुपांतर केलं.

रेनशॉकडे सूत्रं होती. धावगतीचं आव्हान १५पल्याड गेल्यामुळे रेनशॉने धोका पत्करला. मात्र तो रायन बर्लच्या हातात जाऊन विसावला. रेनशॉने ४४ चेंडूत ६५ धावांची खेळी साकारली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळू शकली नाही. रेनशॉ बाद होताच ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. झिम्बाब्वेतर्फे ब्लेसिंग मुझाराबानीने ४ तर ब्रॅड इव्हान्सने ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं.