‘वर्ल्डकप संघात निवड होणार नाही हे कळलं तेव्हा मला वाईट वाटलं. मी पण माणूस आहे. मला वाईट वाटूच शकतं. पण जसे दिवस पुढे गेले तसं निवड न झाल्याबद्दल वाईट वाटणं कमी झालं. काही दिवसात माझे बाबा आजारी पडले. १ फेब्रुवारीला ते गेले. सात दिवस मी त्यांच्याबरोबर होतो. वर्ल्डकपपेक्षा बाबांजवळ असणं आवश्यक होतं हे मला कळलं. त्यानंतर मग वाईटपणा उरलाच नाही. कसलाही पश्चाताप नाही. कोणाबद्दलही माझ्या मनात राग, असूया नाही. स्वत:बद्दलही वाईट वाटलं नाही’, असं विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्माने सांगितलं.
‘देवाने मला बाबांबरोबर राहायची संधी दिली. जेणेकरून मी त्यांची काळजी घेऊ शकेन. मी वर्ल्डकप टीव्हीवर पाहिला. मी भारतीय संघाचे सामने पाहण्याचा पुरेपूर आनंद लुटला. टीव्हीवर पाहताना वेगळंच वाटतं. खेळताना असतं त्यापेक्षा जास्त दडपण पाहताना येतं. भारतीय संघातल्या दोस्तांबद्दल मला प्रचंड आनंद वाटला’, असं जितेश म्हणाला.
जितेशने फिनिशर म्हणून स्वतला सिद्ध केलं होतं. मात्र टी२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर संघव्यवस्थापन आणि निवडसमितीने इशान किशनच्या नावाला प्राधान्य दिलं. आशिया चषक स्पर्धेत जितेश भारतीय संघाचा भाग होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी संघव्यवस्थापनाने इशानला संघात घेण्याचा निर्णय घेतला.
‘बाबा गेले हे मी विसरू शकत नाही. ते सदैव माझ्याबरोबर असतील. कोणाचेही वडील जातात तेव्हा तुम्हाला जबाबदारीची जाणीव होते. आई, भाऊ-कुटुंबीय यांची काळजी घेणं तुमची जबाबदारी होते. मी त्यांच्यासमोर भावना व्यक्त करू शकत नाही. त्यांच्यासमोर कमकुवत होऊन चालणार नाही. मी क्रिकेट खेळत असताना त्या सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष असतं. बाबा जाण्याचं दु:ख प्रचंड आहे. मी त्यातून अद्यापही सावरलेलो नाही. हृदयात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती आयुष्यभर तशीच राहील. बाबाच माझे हिरो होते. ते आता नाहीत हे स्वीकारून पुढे वाटचाल करावी लागेल’, जितेश म्हणाला.
जितेश म्हणाला, ‘ते आज असते तर त्यांनी मला सरावाला जा सांगितलं असतं. माझी काळजी करू नकोस, तू खेळायला जा म्हणाले असते. मी हाच विचार करतो की एखाद्या प्रसंगात त्यांचं काय म्हणणं असेल. मी खेळावं ही त्यांची इच्छा होती. ती मी पूर्ण करू शकलो याचा अभिमान आहे. रिंकूच्या बाबतीतही दुर्देवाने हेच घडलं. त्याची काय मनस्थिती असेल समजू शकतो. त्याच्या इथवरच्या वाटचालीत वडिलांची भूमिका निर्णायक होती. म्हणूनच घरी जाऊन तो पुन्हा खेळायला येऊ शकला’.
जितेशने १६ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व करताना १५१च्या स्ट्राईकरेटने १६२ धावा केल्या आहेत. आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी खेळताना जितेशने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. उत्तम फिनिशर आणि दर्जेदार विकेटकीपर अशी दुहेरी भूमिका त्याने समर्थपणे निभावली.
