Virat Kohli Special Post For Ajinkya Rahane: भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. २०२३ नंतर त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली गेली नव्हती. ३ वर्ष संघाबाहेर राहिल्यानंतर अखेर त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. अजिंक्यने भावुक व्हिडीओ शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. अजिंक्यच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अजिंक्य रहाणेसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी अनेक सामन्यांमध्ये महत्वपूर्ण भागीदारी करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. विराटने त्याला आपला आवडता बॅटिंग पार्टनर म्हटलं आहे. विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत लिहिले की, “जिंक्स, या यशस्वी कारकिर्दीसाठी तुझे मनापासून अभिनंदन मित्रा. तू भारतीय क्रिकेटसाठी अप्रतिम काम केलं आहेस, तुला तुझ्या या प्रवासाचा अभिमान वाटायला हवा. स्लिपमधील सर्वात विश्वासू खेळाडू आणि माझा आवडता बॅटिंग पार्टनर. तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. देव तुझं भलं करो.”

अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याने मोलाचं योगदान दिलं. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३८.४६ च्या सरासरीने ५०७७ धावा केल्या. यादरम्यान त्याने १२ शतकं आणि २६ अर्धशतकं झळकावली. तर वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने ३५.२५ च्या सरासरीने २९६२ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ शतकं आणि २४ अर्धशतकं झळकावली. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला ३७५ धावा करता आल्या.

रहाणेच्या निवृत्तीनंतर माजी फलंदाज युवराज सिंगने देखील खास पोस्ट शेअर केली. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “यशस्वी कारकिर्दीसाठी खूप खूप अभिनंदन जिंक्स! तू तिन्ही फॉरमॅटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि काही महत्वाच्या सामन्यांमध्ये यशस्वी नेतृत्व करणाऱ्या या पिढीतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेस. तुला मिळालेल्या प्रत्येक संधीचं तू सोनं केलं. पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. शकालाका बेबी…”