Nagpur 17 year old female cricketer Aditi Choukhande suicide news: महाराष्ट्रातील नागपूरमधून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. नागपूरमधील १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने आत्महत्या केली आहे. या महिला क्रिकेटपटूची ओळख अदिती चौखंडे अशी पटली आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. अदिती चौखंडे हिने क्रिकेट संघात निवड न झाल्याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिती चौखंडे ही मूळची महाराष्ट्रातील अकोला येथील होती. गेल्या दोन वर्षांपासून ती नागपूरमधील लक्ष्मी नगर येथील ‘उमालक्ष्मी अपार्टमेंट्स’मध्ये आपल्या आईसोबत व भावासोबत राहत होती. तिचे वडील अकोलामध्ये सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. अदितीचं १२वी पर्यंत शिक्षण झालं होतं. अदिती तिच्या भावासोबतच क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे धडे गिरवत होती. बुधवारी रात्री तिच्या आईबरोबर जेवण केल्यानंतर ती तिच्या खोलीत गेली आणि तिने आत्महत्या केली. या घटनेवेळी तिचा भाऊ बाहेर गेला होता.

अदितीच्या शेजारी सुसाईड नोट मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्या चिठ्ठीत अदितीने संघात निवड न झाल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच, आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याची इच्छा असल्याचंही तिने त्या पत्रात नमूद केलं होतं. पोलिसांनी तिचं पत्र वाचून दाखवल्याप्रमाणे त्यात लिहिलं होतं. “दादा तू खूप चांगला खेळतो आहेस, तू खूप पुढे जाशील, आपल्या आई-बाबांना अभिमान वाटेल अशी कामगिरी कर. माझी संघात निवड न झाल्याने मी दु:खी आहे.” अलीकडेच विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) निवड प्रक्रियेत तिची निवड न झाल्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती.

बजाज नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चेतन चौहान यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासावरून निवड न झाल्यामुळे आलेल्या मानसिक तणावामुळे हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पण, आत्महत्येचं नेमकं कारण सविस्तर तपास आणि शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल. पोलीस सर्व पैलूंचा विचार करून या प्रकरणाचा तपास करत आहेत.