झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव टेस्टमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर बांगलादेशने वनडे मालिकेत चांगलं पुनरागमन केलं आहे. वेगवान गोलंदाज नाहिद राणाने बांगलादेशसाठी वनडेतलं सर्वोत्तम प्रदर्शन करत छाप उमटवली. बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराझने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. काटक अंगयष्टीच्या नाहिदने वेग आणि अचूकता यांचा सुरेख मिलाफ साधत झिम्बाब्वेच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

एकमेव कसोटीत शतक झळकावणाऱ्या इनोसंट कियाला नाहिदने नुरूल हसनकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्यानेच सिकंदर रझाला तंबूत धाडलं. वेस्ले माढिवरेला त्याने भोपळाही फोडू दिला नाही. ब्रॅड इव्हान्सला बाद करत नाहिदने झिम्बाब्वेच्या डावाला खिंडार पाडलं. ही नाहिदची पाचवी विकेट होती. झिम्बाब्वेचा कर्णधार रिचर्ड नकाराग्वाला बाद करत नाहिदने सहा विकेट्स घेण्याची करामत केली. नाहिदने १० षटकांमध्ये २ निर्धाव षटकांसह अवघ्या २१ धावांच्या मोबदल्यात ६ विकेट्स टिपल्या. झिम्बाब्वेचा डाव १४१ धावांतच आटोपला.

बांगलादेशसाठी याआधी मश्रफी मुर्तझा, रुबेल हुसेन, रिशाद हुसेन, मुस्ताफिझूर रहमान, शोरिफुल इस्लाम यांनी डावात ६ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र नाहिदने सगळ्यात कमी धावा देत ६ विकेट्स धावा घेत बांगलादेशसाठी वनडेत सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.