वर्षभरावर येऊन ठेपलेल्या वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली. शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अनुभवी शिलेदार असतील. श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार असल्यामुळे ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली आहे.
यष्टीरक्षकाच्या जागेसाठी निवडसमितीने ध्रुव जुरेलच्या नावाला पसंती दिली आहे. पूर्ण फिट नसल्याने हार्दिक पंड्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीत नितीश कुमार रेड्डी संघाचा भाग असणार आहे. केएल राहुल उपकर्णधार आणि यष्टीरक्षक अशा दुहेरी भूमिकेत असेल. यशस्वी जैस्वाल राखीव सलामीवीर असेल. नमन धीरला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळालं आहे.
अनुभवी रवींद्र जडेजाचं संघात पुनरागमन झालं आहे. कुलदीप यादव आणि जडेजा यांच्यावर फिरकीची धुरा असेल. प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी आणि मोहम्मद सिराज या चौकडीवर वेगवान गोलंदाजीचा भार पाहतील.
वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघ- शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, नमन धीर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकिब नबी
टी२० मालिकेसाठीही संघाची निवड
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेसाठीही संघ जाहीर करण्यात आला. श्रेयस अय्यरकडे संघाची धुरा असेल. अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन हे आघाडीची भूमिका सांभाळतील. इशान किशन, तिलक वर्मा मधल्या फळीत असतील. शिवम दुबे आणि नितीश कुमार रेड्डी यांच्याकडून संघाला अष्टपैलू खेळाची अपेक्षा आहे. कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई अशी चौकडी फिरकी आक्रमण सांभाळेल. अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि मयांक यादव असं युवा आक्रमण असेल. जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवडसमितीने संघाची घोषणा केली. आगरकर यांच्या कराराची मुदत पुढच्या महिन्यात संपत आहे. आगरकर यांच्या बरोबरीने या निवडसमितीत आरपी सिंग (मध्य), प्रग्यान ओझा (दक्षिण), अजय रात्रा (उत्तर) आणि शिवसुंदर दास (पूर्व) यांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारतात ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळणार आहे. वनडे मालिका सुरू असतानाच भारताचा अन्य संघ जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे वनडे संघातले अनेक खेळाडू त्या संघाचा भाग असतील. यामुळे वनडे संघाचा चेहरामोहरा बदलला आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपच्या दृष्टीने भारतीय संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश करण्यात येणार ना? हे पाहणं रंजक ठरणार आहे. इंग्लंड दौऱ्यातील शेवटचा वनडे सामना रोहितचा शेवटचा सामना असणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र रोहित उत्तम फॉर्मात असून, तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे असं बीसीसीआयचे सचिव देवजीत साईकिया यांनी स्पष्ट केलं होतं.
वेस्ट इंडिज मालिका आणि इराणी चषकासाठी निवडीसाठी बीसीसीआयची बैठक बुधवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. दुपारनंतर ही बैठक संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं.
वेस्ट इंडिज संघाचा भारतीय दौरा
२७ सप्टेंबर- पहिली वनडे- तिरुवनंतपुरम
३० सप्टेंबर- दुसरी वनडे- गुवाहाटी
३ ऑक्टोबर- तिसरी वनडे- न्यू चंदीगढ
६ ऑक्टोबर- पहिला टी२० सामना- लखनौ
९ ऑक्टोबर- दुसरा टी२० सामना- रांची
११ ऑक्टोबर- तिसरा टी२० सामना- इंदूर
१४ ऑक्टोबर- चौथा टी२० सामना- हैदराबाद
१६ ऑक्टोबर- पाचवा टी२० सामना- बंगळुरू
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, जसप्रीत बुमराह, विपराज निगम, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, यश ठाकूर.
