Naman Dhir On Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. या संघाने आयपीएल स्पर्धेत ५ वेळा जेतेपदाचा मान पटकावला आहे. पण मुंबईचा संघ केवळ जेतेपदांसाठी ओळखला जात नाही. तर हा संघ युवा खेळाडूंना शोधून त्यांना तयार करण्यासाठी ओळखला जातो. इतर संघ स्टार खेळाडूंना आपल्या संघात स्थान देतात, पण मुंबई इंडियन्स हा एकमेव असा संघ आहे, जो नवख्या खेळाडूंना संघात स्थान देतो आणि त्यांना स्टार बनवतो. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा आणि युजवेंद्र चहलसारख्या खेळाडूंना घडवण्याचं काम मुंबई इंडियन्सनेच केलं आहे. दरम्यान या यादीत आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. नमन धीरला भारतीय टी-२० संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच सामन्यात त्याने ३ फलंदाजांना माघारी धाडलं.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेत नमन धीरला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पण या मालिकेत त्याला जास्त फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. तसेच गोलंदाजीत तो आपली छाप सोडू शकला नव्हता. दरम्यान पहिल्या टी-२० सामन्यात पदार्पणाची संधी मिळताच, त्याने ३१ धावा खर्च करून सर्वाधिक ३ गडी बाद केले.
नमन धीरने या यशाचं श्रेय मुंबई इंडियन्स संघाला दिलं आहे. मुंबईकडून खेळण्याचा त्याला चांगलाच फायदा झाला. सामन्यानंतर बोलताना नमन धीर म्हणाला, “आयपीएल स्पर्धा तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करतं. जर तुम्ही मुंबई इंडियन्ससारख्या संघाचं प्रतिनिधित्व करत असाल, तर तुम्ही मोठ्या स्तरावर खेळण्यासाठी आधीपासूनच तयार असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दबाव जाणवत नाही.”
नमन धीरला आतापर्यंत १ वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान नमन धीरने पदार्पण केलं होतं. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने ३० धावांची खेळी केली होती. यासह गोलंदाजी करताना त्याने ५.२ षटकात १ गडी बाद केला होता. या कामगिरीची दखल घेऊन त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ३ गडी बाद केले होते. या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजचा डाव १७१ धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजकडून रूदरफोर्ड आणि शे होपने अर्धशतकं झळकावली. १७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून श्रेयस अय्यरने १०२ धावांची खेळी केली आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
