IND vs NAM T20 WC 2026 Match: टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारताचा पुढील सामना नामिबिया संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना आज म्हणजेच १२ फेब्रुवारीला दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारत आणि नामिबिया यांच्यातील वर्ल्डकपमधील सामना संध्याकाळी खेळवला जाणार आहे. यापूर्वी नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड एरॅसमस यांनी 2026 टी20 विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी स्पर्धेच्या आयोजकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यामुळे आता ICC पुन्हा वादात सापडलं आहे.

गट टप्प्यातील पहिला सामना अमेरिकेविरूद्ध मुंबईत झाल्यानंतर टीम इंडिया दिल्लीला पोहोचली. तर १० तारखेला नेदरलँड्सविरूद्ध सामना खेळल्यानंतर नामिबियाचा संघ दिल्लीला पोहोचला. यानंतर सरावासाठी नामिबिया संघाचं एकही सेशन फ्लडलाईट्समध्ये न झाल्याचा उल्लेख त्याने केला. दिल्लीत त्यांचे दोन्ही ट्रेनिंग सेशन हे सकाळच्या वेळेत पण संघाला सामना मात्र रात्रीच्या वेळेत फ्लडलाईट्समध्ये खेळायचा आहे.

नामिबियाचा कर्णधार गेराल्ड इरास्मस नामिबिया संघाला सामन्यापूर्वी फ्लडलाइट्सखाली सराव करण्याची परवानगी न दिल्यामुळे नाराज होता. ३० वर्षीय खेळाडूने दावा केला की भारताला सलग दोन दिवस संध्याकाळी सराव करण्याची संधी देण्यात आली, मात्र नामिबिया संघाला सूर्यास्तानंतर आणि फ्लडलाइट्स सुरू असताना एकही सराव सत्र मिळालं नाही.

याहूनही आश्चर्यकारक बाब म्हणजे, कॅनडा संघाने बुधवारी (११ फेब्रुवारी) भारतीय संघाप्रमाणे सराव केल्याचे समोर आलं. विशेष म्हणजे त्यांचा सामना यूएईविरुद्ध शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी ३:०० वाजता होणार आहे, ज्यासाठी फ्लडलाइट्सची गरज भासणार नाही.

भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी नामिबियाच्या कॅप्टनने आयसीसीवर का केले आरोप?

“होय, या सामन्यापूर्वी आम्हाला एकदाही रात्रीचा फ्लडलाईट्मध्ये सराव सत्र देण्यात आलेलं नाही, त्याचे कारण मला माहीत नाही. माझ्या मते भारताला दोन वेळा फ्लडलाईट्समध्ये सराव करण्याची संधी मिळाली आहे आणि बाहेर पाहिलं तर कॅनडालाही आता संध्याकाळी सराव करायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा काय अर्थ लावायचा तो लावा. पण आम्ही आमच्या नामिबियन पद्धतीने मैदानात उतरू, म्हणजे कडवी झुंज देऊ,” असं इरास्मसने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

“नामिबियामध्ये आमच्याकडे फ्लडलाइट्स नाहीत. त्यामुळे दिवस-रात्र सामने खेळणं आमच्यासाठी सोपं नाही. पायाभूत सुविधांच्या दृष्टीने ते आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. ज्यांना असा अनुभव नाही, त्यांच्यासाठी ही साधी गोष्ट नाही. नेपाळ प्रीमियर लीग, आयएलटी२० आणि आम्ही खेळलेल्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या काही खेळाडूंना अपवाद मानला, तर बहुतेकांना फ्लडलाइट्सखाली खेळण्याची आणि सराव करण्याची फारशी सवय नसते,” असं त्यांनी पुढे सांगितलं.

स्पर्धेतील नामिबियाचा पहिला सामना सकाळी ११:०० वाजता खेळवण्यात आला, तर पुढील दोन सामने यूएई आणि पाकिस्तानविरुद्ध अनुक्रमे चेन्नई आणि कोलंबो येथे दुपारी ३:०० वाजता सुरू होतील. तर फक्त भारताविरूद्ध सामना संध्याकाळी होणार आहे.

दरम्यान, भारत आणि नामिबिया यांच्यात टी-२० इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच आमनेसामने सामना होणार आहे. यापूर्वी २०२१ च्या टी-२० विश्वचषकात दुबई येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. तो सामना विराट कोहलीचा भारताच्या टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना ठरला होता.