‘आम्ही लिंबूटिंबू नाही’ हे पु्न्हा एकदा सिद्ध करत नामिबियाने तिरंगी मालिकेत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर १८ धावांनी दिमाखदार विजय मिळवला. गेल्या वर्षी एकमेव टी२० सामन्यात नामिबियाने दक्षिण आफ्रिकेला नमवण्याची किमया केली होती. त्यावेळी तो एका सामन्याचा चमत्कार मानला गेला. मात्र वर्षभरात सख्खे शेजारी नामिबियाने आफ्रिकेला चीतपट केला.

आफ्रिकेचा कर्णधार ब्युऑन फॉर्च्युनने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. नामिबियाचा सलामीवीर जॅन फ्रायलिंकने ३८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांनिशी ६० धावांची तडाखेबंद खेळी केली. लोरेन स्टीनकॅम्पने २९ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. या दोघांनी ८४ धावांची खणखणीत सलामी दिली. ही जोडी फुटल्यानंतर नामिबियाची घसरगुंडी उडाली. दक्षिण आफ्रिकेतर्फे प्रेरलन सुब्रयानने ३ तर ड्युऑन यान्सन आणि ब्युऑन फॉर्च्युन यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. नामिबियाने १६३ धावांची मजल मारली. दक्षिण आफ्रिका या आव्हानाचा पाठलाग करेल असं चित्र होतं. मात्र डेवाल्ड ब्रेव्हिसचा अपवाद वगळता आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

धडाकेबाज फलंदाज ल्युहान डी प्रिटोरस ९ धावा करुन तंबूत परतला. टोनी द झोरीही मोठी खेळी करू शकला नाही. कॉनर इस्थरझ्युइनकडून अपेक्षा होत्या मात्र तो ४ धावा करून माघारी परतला. साथीदार नियमित अंतरात बाद होत असतानाही ब्रेव्हिसने चौकार, षटकारांची लयलूट सुरूच ठेवली. ब्रेव्हिस खेळपट्टीवर असेपर्यंत आफ्रिकेला विजयाची आशा होती. 18व्या षटकात ट्रम्पलमानने ब्रेव्हिसला बाद केलं आणि आफ्रिकेच्या विजयाची आशा मावळल्या. ब्रेव्हिसने ५० चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. ड्युआन यान्सनने २५ धावा करत ब्रेव्हिसला साथ देण्याचा प्रयत्न केला. नामिबियातर्फे रुबेन ट्रम्पलमान आणि जेजे स्मूट यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

नामिबियात आयोजित तिरंगी मालिकेतला हा पहिलाच सामना होता. झिम्बाब्वे या स्पर्धेतला तिसरा संघ आहे. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेसाठी सर्व प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. यामुळे ब्युऑन फॉर्च्युनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. आशिया चषकाच्या धर्तीवर आफ्रिका चषकसदृश स्पर्धा आयोजित करण्याचा हा प्रयत्न आहे.

गेल्या वर्षी आफ्रिकेच्या संघाने नामिबियाविरुद्ध एकमेव सामना खेळला होता. त्या सामन्यात आफ्रिकेला १३४ धावाच करता आल्या होत्या. नामिबियाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं होतं.