‘काही बातम्या तुम्हाला उन्मळून टाकतात. नाना पाटेकरांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला. अजूनही विश्वास बसत नाहीये. नानाजींबद्दल असं व्यक्त व्हावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. नेमबाजी हा आम्हा दोघांना जोडणारा समान धागा. त्यांना नेमबाजी आवडायची. त्यांचं या खेळाप्रति प्रेम निस्सीम होतं. नेमबाजांचं आयुष्य कसं असतं, त्यांच्यासमोर काय आव्हानं असतात, हा खेळ किती कठीण आहे याविषयी त्यांना सखोल जाण होती. नेमबाजी या खेळासाठी, नेमबाजांसाठी ते सदैव उपलब्ध असायचे. खेळ आणि खेळाडूंसाठी त्यांना जे करणं शक्य होतं ते त्यांनी केलं’, अशा शब्दात अव्वल नेमबाज गगन नारंग यांनी नाना पाटेकरांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. 

सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये गगन लिहितात, ‘आम्ही सगळे एकत्र बसायचो. गप्पागोष्टी, धमाल चालायची. एकत्र जेवायचो. त्यांनी आमच्याकरता अतिशय प्रेमाने स्वयंपाक केला होता. एवढे मोठे कलाकार असूनही आमच्याबरोबर वावरताना कुठलाही आवेश, अभिनिवेश नसायचा. त्यांच्या साधेपणाचं आम्हाला आश्चर्य वाटायचं. त्यांचं मन अतिशय मोठं होतं. आम्ही अलीकडेच अहमदाबाद इथे भेटलो. त्यांच्या पुण्यातल्या शेतघरी भेटण्याविषयी बोलणं झालं. तिथे एकत्र नेमबाजीचा सराव करू यावरही बोलणं झालं. मला सरावासाठी अम्युनिशन दे असंही त्यांनी सांगितलं. ते मला प्रेमाने गगन्या म्हणायचे. ती आमची शेवटची भेट ठरेल असं कदापिही वाटलं नाही. काही मैत्र किती वेळा भेटलो यावर अवलंबून नसतात. तुमचं नातं किती घट्ट आहे यावरून ऋणानुबंध ठरतो. त्यांच्याबरोबरचं बोलणं मिस करेन. त्यांनी प्रेमाने स्वत: करून खिलवणं, हास्यविनोद, गप्पा आणि या सगळ्यापलीकडे उदार मनाचा जिंदादील माणूस- हे काहीच नसेल आता. तुमची उणीव प्रकर्षाने जाणवेल’. 

नेमबाजी आणि नाना पाटेकर हे निराळंच समीकरण होतं. अभिनयात सामर्थ्यपूर्ण मुशाफिरी करणाऱ्या नानांनी नेमबाजीसारख्या अवघड खेळात प्राविण्य मिळवलं होतं. ते नियमित सरावही करायचे. देशभरातील नेमबाजांशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. त्यांच्या जाण्याने नेमबाजी विश्वात आपला माणूस गमावल्याची भावना आहे. 

नाना पाटेकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गोव्यात होते.  हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं.  नाना पाटेकर यांना मध्यरात्री २ वाजून ३० मिनिटांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मित्राला त्यासंदर्भात मेसेज केला होता. मात्र, रात्र असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. मित्राने मेसेज पाहताच ते पहाटे चार वाजता नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा नाना फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ केअर टेकरला बोलावून रुग्णालयातून रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिकेबरोबर त्यांचं वैद्यकीय पथकही निवासस्थानी दाखल झाले. वैद्यकीय पथकाने नानांना सीपीआर दिला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मणिपाल रुग्णालयात दाखल केले. तिथेही सीपीआर देण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी (कर्करोग) विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.