Nandini Sharma Record: येत्या काही दिवसात आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधी भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून नंदिनी शर्माला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. तिने पदार्पणाच्या सामन्यात दमदार गोलंदाजी केली आणि भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. यादरम्यान तिने १६ वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
भारतीय संघ काही दिवसात टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेली टी-२० मालिका ही भारतीय संघांसाठी रंगीत तालीम आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय खेळाडूंकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. हा सामना भारतीय संघाने ३८ धावांनी जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेल्या नंदिनी शर्माने या संधीचा पुरेपूर फायदा घेत ३४ धावा देत इंग्लंडच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. ही कुठल्याही भारतीय गोलंदाजाने हा सामन्यात केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली.
नंदिनी शर्मा हा मध्यमगती वेगवान गोलंदाज आहे. या सामन्यात ३ गडी बाद करताच तिच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. नंदिनी शर्मा ही टी-२० पदार्पणात ३ गडी बाद करणारी दुसरीच भारतीय वेगवान गोलंदाज ठरली आहे. याआधी हा रेकॉर्ड सोनिया दबीरच्या नावे होता. सोनियाने देखील २०१० मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० पदार्पण केलं होतं. या सामन्यात तिने २३ धावा खर्च करून ३ गडी बाद केले होते. आता नंदिनी शर्मा असा कारनामा करणारी दुसरी भारतीय वेगवान गोलंदाज ठरली आहे. तर सातवी भारतीय गोलंदाज ठरली आहे, जिने पदार्पणात ३ गडी बाद केले आहेत.
भारतीय संघाचा दमदार विजय
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय महिला संघाकडून जेमिमा रॉड्रिग्जने ६९ धावांची खेळी केली. तर यस्तिका भाटियाने ५४ धावा केल्या. दीप्ती शर्माने शेवटी २२ धावा केल्या. या खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने ७ गडी बाद १८८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला १५० धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारताने हा सामना ३८ धावांनी आपल्या नावावर केला.
