मुंबईचा ऑलिम्पिकपटू नरसिंग यादव याने लागोपाठ दुसऱ्या वर्षी ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मान मिळविला. अंतिम फेरीत जळगावच्या विजय चौधरी याला  अस्मान दाखवीत नरसिंगने सलग दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ ची गदा अभिमानाने उंचावली.
हजारो कुस्ती चाहत्यांच्या उपस्थितीत झालेल्या अंतिम लढतीत नरसिंग याने विजय चौधरी याच्यावर रोमहर्षक विजय मिळविला. चुरशीने झालेल्या या लढतीत चौधरी याने नरसिंगविरुद्ध दोन मिनिटांच्या पहिल्या फेरीत सुरेख कौशल्य दाखविले. ही फेरी त्याने गुणांवर घेतली मात्र नरसिंग याने त्याचे दडपण न घेता दुसऱ्या फेरीत पहिल्याच मिनिटाला चौधरी याला लपेट डाव टाकून खाली खेचले आणि क्षणार्धात त्याला चीत केले. नरसिंग याने गतवर्षी अकलूज येथे झालेल्या अधिवेशनात महाराष्ट्र केसरी किताब मिळविला होता. चपळतेसाठी प्रसिद्ध असलेल्या नरसिंग यादव यांनी विजय चौधरी यांना कोणतीही संधी न देता अवघ्या अडीच मिनिटात डाव संपवला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या नरसिंगने लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.