Naseem Shah Controversial Post: पाकिस्तान सुपर लीग २०२६ ला २६ मार्चपासून सुरूवात झाली आहे. पण सामन्यांमधील कामगिरी आणि विक्रमांपेक्षा वादांमुळेच ही स्पर्धा अधिक चर्चेत आहे. देशात युद्धजन्य परिस्थिती असताना पीएसएलचे सामने बंद दरवाज्यांमागे खेळवणं, बाहेरच्या देशांमधील क्रिकेटपटूंना धमकी मिळणं, जर्सीचा रंग जात असल्याने पांढऱ्या चेंडूचा गुलाबी चेंडू होणं, अशी विचित्र प्रकरण ऐकू आली. यादरम्यान आता पाकिस्तानी खेळाडू नसीम शाहने आपल्याच देशातील महिला मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. यानंतर नसीम शाहविरूद्ध पीसीबीने आता अॅक्शन घेतली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) नसीम शाहला त्यांच्या केंद्रीय कराराचे आणि माध्यम धोरणाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली नोटीस बजावली आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या पहिल्या सामन्यापूर्वी पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याबद्दल केलेल्या ट्विट्बद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) वेगवान गोलंदाज नसीम शाहला नोटीस बजावली आहे. मरियम नवाज या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी आहे.

इंधनाच्या तुटवड्यामुळे ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय आयोजित केली जाईल, असं पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी जाहीर केलं होतं. पण, पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्यासह काही विशेष पाहुण्यांना सामन्याला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत त्या गद्दाफी स्टेडियममध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी लाहोर कलंदर्स व हैदराबाद किंग्समेनच्या खेळाडूंची भेटही घेतली.

नसीम शाहने महिला मुख्यमंत्र्यांबाबत काय वक्तव्य केलं?

नसीम शाहने पीसीबीच्या एका अधिकृत पोस्टला रिशेअर करत, मरियम नवाज यांच्या स्टेडियममधील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं ट्विट केलं. त्यांने लिहिलं, “त्यांना लॉर्ड्सच्या राणीसारखी वागणूक का दिली जात आहे?” नसीमच्या मते लॉर्ड्सच्या मैदानावर राणीला जशी वागणूक दिली जाते, तशी वागणूक हिला का दिली जात आहे, म्हणजेच एके ठिकाणी दरवाजाआड सामने होत आहेत आणि तिच्यासाठी मात्र खास व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काही मिनिटांनंतर हे ट्विट हटवण्यात आलं. परिणामी, पीसीबीने नसीम शाहला शो-कॉज नोटीस बजावली आहे. खेळाडूकडून प्रतिसाद मिळाल्यानंतरच कारवाई काय करायची हे ठरवलं जाईल, असं मंडळाने म्हटलं. पीसीबीच्या आचारसंहितेच्या कलम २.२३ नुसार, मंडळाचे अधिकारी किंवा त्याच्या धोरणांवर सार्वजनिकरित्या टीका करण्यास मनाई आहे.

अष्टपैलू खेळाडू अमीर जमालला इमरान खानला पाठिंबा दिल्याबद्दल लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. दरम्यान, नसीम शाह पीएसएल २०२६ मध्ये रावळपिंडी संघाकडून खेळत असून, त्याचा पहिला सामना शनिवारी पेशावर झल्मीविरुद्ध आहे. खेळाडूंच्या सोशल मीडियावरील हालचाली आणि बोर्डाच्या कठोर धोरणांसंदर्भात हा मुद्दा पाकिस्तानी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.