Natalie Sciver Brunt Walks Out with Son Video: महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आमनेसामने आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ या स्पर्धेत अपराजित राहिले आहेत, आता दोन्ही अपराजित संघ एकमेकांसमोर ट्रॉफी जिंकण्यासाठी भिडत आहेत, त्यामुळे हा सामना अधिक रोमांचक होणार आहे. यादरम्यान सामन्याची नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, तत्पूर्वी इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर ब्रंटही मैदानावर तिच्या लेकासोबत उतरली होती, या सुंदर व्हीडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंड महिला संघाची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट आपल्या मुलगा थियोसोबत मैदानावर येताना दिसली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उजव्या हाताची फलंदाज सायव्हर-ब्रंट राष्ट्रगीतासाठी आपल्या मुलासह मैदानात प्रवेश करताना दिसली. या भावनिक क्षणाने उपस्थित चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं.
दरम्यान, लॉर्ड्स क्रिकेट मैदानावरील अंतिम सामन्यात नाणेफेक ऑस्ट्रेलियाची कर्णधार सोफी मोलिन्यूने जिंकली आणि तिने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या सामन्यासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.
नताली सायव्हर ब्रंटने इंग्लंड संघाची माजी खेळाडू कॅथरीन सायव्हर ब्रंट हिच्याशी विवाह केला. या दोघींनी २०१७ मध्ये साखरपुडा केला होता. विशेष म्हणजे, त्याच दिवशी इंग्लंडने महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर मे २०२२ मध्ये दोघींनी विवाह केला. या जोडप्याला थियो नावाचा मुलगा असून तो अनेकदा त्यांच्यासोबत विविध आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर दिसतो. इंग्लंडच्या सामन्यांदरम्यानही थियो अनेकदा संघासोबत आनंद साजरा करताना दिसतो आणि त्यामुळे तो चाहत्यांच्याही आकर्षणाचा विषय ठरला आहे.
इंग्लंड महिला संघ:
एमी जोन्स (यष्टिरक्षक), डॅनी वायट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), अॅलिस कॅप्सी, हेदर नाईट, फ्रेया केम्प, डॅनिएल गिब्सन, शार्लोट डीन, लिंसी स्मिथ, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल.
ऑस्ट्रेलिया महिला संघ:
जॉर्जिया वॉल, बेथ मूनी (यष्टिरक्षक), फिबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ॲश्ले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिन्यू (कर्णधार), किम गार्थ, ल्युसी हॅमिल्टन.
