नॅथन एलिस आणि स्पेन्सर जॉन्सन ही शेवटची जोडी एकत्र आली तेव्हा ऑस्ट्रेलियाला २७ चेंडूत २७ धावा हव्या होत्या. झिम्बाब्वेचं पारडं जड होतं. या जोडीने कसलेल्या फलंदाजाप्रमाणे फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावून घेतला. ५०व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर एलिसने एकेरी धाव घेत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची ही मालिका आधीच जिंकली होती. त्यामुळे हा सामना डेड रबर होता. झिम्बाब्वेने दिलेल्या २७२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची २४५/९ अशी झाली होती. नॅथन एलिस आणि स्पेन्सर जॉन्सन हे गोलंदाज फलंदाजी करत होते. त्यामुळे झिम्बाब्वेचं पारडं जड होतं. सिकंदर रझा, ग्रीम क्रीमर हे अनुभवी गोलंदाज होते. ब्रॅड इव्हान्सने चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या षटकात ६ चेंडूत ९ धावा हव्या असताना झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने वेस्ले माढिवरेला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. अनुभवी फिरकीपटू क्रीमरचं एक षटक बाकी होतं मात्र त्याच्याऐवजी माढिवरेला गोलंदाजी देण्यात आली. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडला. फिरकीविरुद्ध त्यांना फटकेबाजी करता येत नव्हती. माढिवरेच्या पहिल्याच चेंडूवर एलिसने लॉन्गऑन क्षेत्रात खणखणीत षटकार खेचत आव्हान सोपं केलं.
पुढच्या चेंडूवर एलिसने एक धाव घेत जॉन्सनला स्ट्राईक दिला. पुढचा चेंडू निर्धाव गेला तरी या जोडगोळीने दडपण घेतलं नाही. चौथ्या चेंडूवर जॉन्सनने एक धाव घेतली. पाचव्या चेंडूवर एलिसने एक धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. अॅडम झंपा बाद झाला तेव्हा २७ चेंडूत २७ असं समीकरण होतं. एलिस-जॉन्सन जोडीने पुरुन उरत ऑस्ट्रेलियाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत निर्भेळ यश मिळवलं.
ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. जोश हेझलवूड एकच सामना खेळला. त्यांच्या अनुपस्थितीत झेव्हियर बार्टलेट, नॅथन एलिस आणि स्पेन्सर जॉन्सन यांनी जबाबदारी सांभाळली.
या लढतीत झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २७१ धावांची मजल मारली. कर्णधार सिकंदर रझाने ८१ धावांची खेळी केली. क्रेग अर्व्हाइनने ५९ तर इनोसंट कालाने ५५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियातर्फे एलिसने ३ तर स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झंपा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जोश इंगलिसने ११ चौकारांसह १०३ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. पाठलागाची सूत्रं हाती घेत इंगलिस विजय मिळवून देणार वाटत असतानाच तो बाद झाला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने हार मानली नाही. शतकी खेळी करणाऱ्या इंगलिसला सामनावीर तर कूपर कॉनलीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
