अहमदाबाद : महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी स्केटिंगमध्ये सुवर्णपदक मिळविले. तसेच नौकानयन, कुस्ती, तिहेरी उडी, स्केटिंग, जलतरण या क्रीडा प्रकारांतील खेळाडूंनी महाराष्ट्राला रौप्यपदकाची कमाई करून दिली. जिम्नॅस्टिक आणि कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कांस्यपदके मिळविली.
स्केटिंग स्पर्धेचा अखेरचा दिवस महाराष्ट्र संघासाठी सोनेरी ठरला. विक्रम इंगळे, सिद्धांत कांबळे, सुरुद सुर्वे व आर्य जुवेकर यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या पुरुष रिले संघाने सुवर्णपदक पटकावले. आर्य जुवेकरने १००० मीटर स्केटिंग शर्यतीत रौप्यपदक जिंकले.
महाराष्ट्राला नौकानयनात विपुल घाटे आणि ओंकार म्हस्के यांनी रौप्यपदक मिळवून दिले. त्यांनी पुरुषांच्या गटातील कॉक्सलेस दुहेरी प्रकारात दोन हजार मीटरचे अंतर सहा मिनिटे ४२ सेकंदांत पूर्ण केले. आशिया पदक विजेती मृण्मयी साळगावकरने महिलांच्या एकेरी स्कलमध्ये अंतिम फेरी गाठली.
जलतरणातील १०० मीटर फ्री-स्टाइल रिले शर्यतीत महाराष्ट्राने रौप्यपदक मिळवले. महाराष्ट्राच्या संघात पलक जोशी, अनुष्का पाटील, दिवा पंजाबी, अवंतिका चव्हाण यांचा समावेश होता. इशिता रेवाळेने ४१.८० गुणांसह आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये कांस्यपदक मिळवले. पूर्वा सावंतने तिहेरी उडीत १२.७६ मीटर उडी मारताना कांस्यपदक जिंकले. बास्केटबॉल आणि खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली. बॅडिमटनमध्ये उपांत्य फेरीत महाराष्ट्राला तेलंगणाकडून हार पत्करावी लागली.
कुस्तीत वेताळ शेळकेला रौप्य
कुस्तीमध्ये फ्री-स्टाइल प्रकाराच्या ८६ किलो वजनी गटात वेताळ शेळकेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सुवर्णपदकाच्या लढतीत उत्तर प्रदेशच्या जॉन्टी कुमारकडून तो पराभूत झाला. या लढतीत त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतरही तो उपचार घेऊन या लढतीत खेळला. ऑलिम्पिकपटू नरसिंग यादवला उपांत्य फेरीतील पराभवानंतर रेपीचेजमधून संधी मिळाली. यात त्याने साईराज राठोडला पराभूत करून कांस्यपदक मिळविले. ग्रीको-रोमन प्रकारात तुषार दुबेने उत्तर प्रदेशच्या यितदर सिंहला नमवत कांस्यपदक जिंकले. महिलांच्या ५४ किलो गटात स्वाती शिंदे आणि ५७ किलो वजन गटात सोनाली मंडलिकने कांस्यपदक पटकावले.