महाराष्ट्राच्या महिलांनी ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिलेत सोनेरी कामगिरी करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणामध्ये अपेक्षापूर्ती केली. मात्र पुरुषांच्या रिलेत ऑलिम्पिकपटू वीरधवल खाडेचा समावेश असलेल्या महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या मोनिक गांधी व पूर्वा शेटय़े यांनी ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. 

आकांक्षा व्होरा, आरती घोरपडे, आदिती घुमटकर व मोनिक गांधी यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने रिले शर्यतीचे अंतर ४ मिनिटे ४.५७ सेकंदांत पार केले. कर्नाटक व केरळ यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. मोनिक गांधी हिला ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत सोनेरी यशापासून वंचित व्हावे लागले. तामिळनाडूच्या ए.जयलीनाने तिला पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले. गांधीच्या पाठोपाठ पूर्वा शेटय़े हिने कांस्यपदक मिळविले.
पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत यजमान केरळ संघाने ३ मिनिटे ३२.३० सेकंद वेळ नोंदवीत सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे, रोहित हवालदार, विराज प्रभु व सौरभ संगवेकर यांचा समावेश असलेल्या संघाने ही शर्यत ३ मिनिटे ३३.३० सेकंदांत पार केली. मध्य प्रदेश संघाला कांस्यपदक मिळाले.
२०० मीटर बटरफ्लाय शर्यत केरळच्या साजन प्रकाशने जिंकली तर ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकचे विजेतेपद ऑलिम्पिकपटू संदीप शेजवळ याने मिळविले. तो यंदा मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करीत आहे. मध्य प्रदेशच्याच रिचा मिश्राने २०० मीटर बटरफ्लाय शर्यत दोन मिनिटे २१.६६ सेकंदांत जिंकली.

खो-खो : दुहेरी मुकुटाची संधी
महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे खो-खो मध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटांत अंतिम फेरीत स्थान मिळविले व दुहेरी मुकुटाच्या दिशेने आव्हान राखले. महिलांच्या एकतर्फी उपांत्य लढतीत महाराष्ट्राने पश्चिम बंगाल संघावर ९-५ असा एक डाव चार गुणांनी शानदार विजय मिळविला. त्या वेळी त्यांच्याकडून प्रियंका येळे (२मि.५० सेकंद), सारिका काळे (२ मि.५५ सेकंद) व शिल्पा जाधव (तीन गडी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. बंगालच्या दीपिका चौधरीची लढत अपुरी ठरली. उपांत्य फेरीतील अन्य लढतीत केरळने कर्नाटकचे आव्हान ११-६ असे संपुष्टात आणले, त्याचे श्रेय डी.शीबा व राधिकाकुमारी यांनी केलेल्या अष्टपैलू खेळास द्यावे लागेल. पुरुषांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने कर्नाटक संघाचा ११-८ असा एक डाव तीन गुणांनी दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राकडून कर्णधार नरेश सावंत (२ मि.१० सेकंद), दीपेश मोरे (साडेतीन मिनिटे), युवराज जाधव (नाबाद १मि.४० सेकंद, १ मि.५० सेकंद व तीन गडी) यांनी सुरेख खेळ केला. महाराष्ट्राला विजेतेपदासाठी केरळ संघाशी खेळावे लागणार आहे. केरळने पश्चिम बंगालचा १०-८ असा पराभव केला.
वेटलिफ्टिंगमध्ये प्रफुल्लकुमार विजेता
सेनादलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रफुल्लकुमार दुबेने वेटलिफ्टिंगमधील १०५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्याने ३२६ किलो वजन उचलले. ९४ किलो गटात जमीर हुसेनला विजेतेपद मिळाले.

जिम्नॅस्टिक्समध्ये रौप्य
महाराष्ट्राने कलात्मक जिम्नॅस्टिक्समध्ये रौप्यपदक मिळवीत उल्लेखनीय कामगिरी केली. तनया कुलकर्णी, उर्वी अभ्यंकर, श्रावणी वैद्य, श्रावणी राऊत, श्रद्धा तळेकर व वंदिता रावळ यांचा समावेश होता.

महाराष्ट्राला कांस्य
तामिळनाडू व गुजरातने टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिलांच्या सांघिक विभागात विजेतेपद मिळविले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने तेलंगणा संघावर २-१ अशी मात केली. राष्ट्रीय क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू अंकिता रैनाचा समावेश असलेल्या गुजरातने महिलांच्या अंतिम लढतीत तेलंगणा संघाचेच आव्हान २-० असे परतवित सोनेरी कामगिरी केली. दोन्ही गटांत महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले.

कुस्तीत रेश्मा मानेला कांस्य
महाराष्ट्राच्या रेश्मा मानेला महिलांच्या कुस्तीत कांस्यपदक मिळाले. ६३ किलो गटात तिला उपांत्य फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. काल नंदिनी काळोखे हिला ४८ किलो गटांत रौप्यपदक मिळाले होते. अंतिम लढतीत तिला हरयाणाच्या रितूकुमारी हिने एकतर्फी हरविले.