ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील कामगिरीची तुलना अयोग्य!

अवनी आणि भारतीय नेमबाजांच्या कामगिरीबाबत अर्जुन पुरस्कार विजेत्या शिरूर यांच्याशी केलेली खास बातचीत-

आठवडय़ाची मुलाखत – सुमा शिरूर, राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक

अन्वय सावंत, लोकसत्ता
मुंबई : ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धामधील नेमबाजांच्या कामगिरीची तुलना करणे योग्य ठरणार नाही, असे मत राष्ट्रीय रायफल नेमबाजी प्रशिक्षिका सुमा शिरूर यांनी व्यक्त केले. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताची पदकांची पाटी कोरीच राहिली, तर पॅरालिम्पिकमध्ये  मात्र भारताने नेमबाजीत पाच पदके जिंकली.

पॅरालिम्पिकमधील कामगिरीमुळे आता भारतीय नेमबाज जागतिक स्तरावर पदकविजेते ठरू शकतात, असा चाहत्यांना पुन्हा विश्वास वाटू लागला आहे, असेही शिरूर यांनी नमूद केले. तसेच त्यांची शिष्या अवनी लेखाराने यंदा पॅरालिम्पिक पदार्पणातच १० मीटर एअर रायफल एसएच१ नेमबाजी प्रकारात सुवर्ण, तर ५० मीटर रायफल थ्री पोजिशन नेमबाजी एसएच१ प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. अवनी आणि भारतीय नेमबाजांच्या कामगिरीबाबत अर्जुन पुरस्कार विजेत्या शिरूर यांच्याशी केलेली खास बातचीत-

’ ऑलिम्पिकमध्ये तुम्ही भारतीय पथकाच्या सोबतच होतात. आतासुद्धा अवनीच्या प्रशिक्षक म्हणून पॅरालिम्पिकसाठी टोक्योला जाण्याची संधी मिळाली. या दोन स्पर्धामधील भारतीय नेमबाजांच्या खेळात तुम्हाला काय फरक दिसला?

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धामधील नेमबाजांच्या कामगिरीची तुलना करणे योग्य ठरणार नाही. दोन्ही स्पर्धामध्ये सहभागी होणारे नेमबाज आणि त्यांची परिस्थिती यात बराच फरक आहे. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारताचे नेमबाज मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. ते जागतिक क्रमवारीत चांगल्या स्थानांवर होते. त्यांना पदके  मिळाली नाहीत. मात्र, यालाच खेळ म्हणतात. पॅरालिम्पिकमध्ये अवनीने पहिल्याच नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने इतर नेमबाजांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे त्यांनाही चांगली कामगिरी करण्यात यश आले.

’ अवनी पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी भारताची पहिली महिला क्रीडापटू ठरली. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबाबत काय सांगाल?

प्रशिक्षक म्हणून अवनीच्या कामगिरीचा मला अभिमान आहे. पॅरालिम्पिक पदार्पणातच १० मीटर एअर रायफल एसएच१ नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकताना तिने विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. तसेच ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी एसएच१ प्रकाराच्या पात्रता फेरीतही अवनीने विश्वविक्रम मोडताना दुसरे स्थान पटकावले होते. अंतिम फेरीत ती आधी सहाव्या क्रमांकावर होती. मात्र, तिने हार न मानता कांस्यपदक पटकावले. समारोप सोहळ्यात तिने भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावली. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.

’ तुम्ही अवनीला प्रशिक्षण देण्यास कधी सुरुवात केली?

अवनीच्या वडिलांनी २०१७ मध्ये तिला प्रशिक्षण देण्याची मला विनंती केली होती, परंतु त्या वेळी पॅरा-खेळाडूंना कशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते, याबाबत मला फारशी माहिती नव्हती. २०१८ मध्ये अवनीच्या वडिलांनी मला पुन्हा तिला प्रशिक्षण देण्याचा आग्रह केला. त्यानंतर मी अवनीला भेटायला बोलावले. मी तिला पाहिले आणि त्यानंतर तिला प्रशिक्षण द्यायला नाही म्हणणे मला शक्यच नव्हते. माझ्यासाठी हे एक आव्हान होते. मात्र, मी तिला पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याइतपत तयार करू शकले, याचा अभिमान वाटतो, परंतु खरे श्रेय हे अवनीला आणि तिच्या जिद्दीलाच जाते.

’ भारताला याआधी पॅरालिम्पिक नेमबाजीत एकही पदक जिंकता आले नव्हते. यंदा मात्र भारताने पाच पदके पटकावली. याबाबत काय म्हणाल?

भारतीय नेमबाजांची यंदाच्या पॅरालिम्पिकमधील कामगिरी प्रेरणादायी होती. ऑलिम्पिकनंतर मी फार खूश नव्हते, परंतु आता पॅरालिम्पिकनंतर मी आनंदाने मायदेशी परतेन. माझ्यासाठी वैयक्तिकदृष्टय़ा हे यश खूप गरजेचे होते. एखाद्या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर आपल्याला यशस्वी ठरायचे असते, पदके जिंकायची असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला पॅरालिम्पिकमध्ये आपले राष्ट्रगीत ऐकण्याची संधी मिळाली. यापेक्षा मोठा आनंद नाही. त्यामुळे तीन वर्षांनी पुन्हा होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मला वेगळीच ऊर्जा मिळाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: National shooting coach suma shirur interview for loksatta zws

ताज्या बातम्या