भारताच्या आघाडीच्या रायफल आणि पिस्तूल नेमबाजांनी ६३व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत आपली घोडदौड कायम राखली आहे. बुधवारी अंजुम मुद्गिलने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली.

याचप्रमाणे अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंग देसवालने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात राष्ट्रीय जेतेपद पटकावले आहे. महाराष्ट्राच्या हर्षदा निथावे आणि अनिकेत जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मनू भाकरने सरबज्योत सिंगच्या साथीने कनिष्ठ मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक मिळवताना राष्ट्रीय स्पर्धेतील सातव्या सुवर्णाची नोंद केली. मंगळवारी तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील वरिष्ठ, कनिष्ठ आणि सांघिक गटांमध्ये चार सुवर्णपदके जिंकली होती.

अंजुमने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान मिळवताना ११७२ गुण मिळवले. मग अंतिम फेरीत सुवर्णलक्ष्य साधताना अंजुमने ४४९.९ गुण मिळवले, तर तमिळनाडूच्या एन. गायत्रीला २.६ गुण कमी मिळाले.

राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेच्या यजमानपदाची भारताला संधी

नवी दिल्ली : बर्मिगहॅमच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वजा करण्यात आले आहे. याची भरपाई म्हणून २०२२च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेचे यजमानपद भारताला सोपवण्याची योजना आखली जात आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (आयओए) याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या क्रीडा समितीकडे जानेवारीच्या पूर्वार्धापर्यंत प्रस्ताव करण्याचे निर्देश भारताला देण्यात आले आहेत. त्यानंतर कार्यकारिणी समितीच्या बैठकीत यजमानपदाची निश्चिती होईल. राष्ट्रकुल क्रीडा महासंघ आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या ५ डिसेंबरला म्यूनिक येथे झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रणिंदर सिंगसुद्धा उपस्थित होते.