वृत्तसंस्था, नवी दिल्ली
प्रदीर्घ मूल्यांकनानंतर क्रीडा मंत्रालयाने अखेर २०२५ वर्षासाठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची मंगळवारी घोषणा केली. देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कारासाठी यंदा एकाही खेळाडूची निवड करण्यात आली नाही. तसेच ‘अर्जुन’ पुरस्काराच्या संख्येतही कपात करताना १७ खेळाडूंनाच पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि विदित गुजराथीचाही समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुणकुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने हॉकीपटू हार्दिक सिंग याच्या नावाची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस केली होती. मात्र, क्रीडा मंत्रालयाने त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास नकार दिला. कोणत्याही खेळाडूला ‘खेलरत्न’ पुरस्कार न देण्याची ही २०१४ नंतरची पहिलीच वेळ ठरली.
पुरस्कार्थींच्या संख्येत कपात
क्रीडा मंत्रालयाने यावेळी अर्जुन पुरस्काराच्या पुरस्कार्थींच्या संख्येतही कपात केली. निवड समितीने शिफारस केलेल्या २४ खेळाडूंपैकी १७ खेळाडूंनाच मंत्रालयाने पुरस्कारासाठी पात्र ठरवले. पुरस्कारांच्या घोषणेला उशीर झाल्याबद्दल क्रीडा मंत्रालयाने दिलगिरी व्यक्त केली. पुरस्कारांची प्रतिष्ठा राखण्यासाठी योग्य नावांचाच सन्मान केला जावा, यासाठी मंत्रालयाने पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली. तिची अंमलबजावणी करताना पुरस्कारांच्या घोषणेला विलंब झाला, असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.
क्रीडा संघटना समाधानी
पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी केवळ निवड समितीवर अवलंबून न राहता स्पष्ट निकष आणि गुणपद्धती असावी, जेणेकरून अपात्र नामांकनेच सादर होणार नाहीत, याची काळजी मंत्रालयाकडून घेतली जात आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या घोषणेला उशीर होण्याची १९९१ नंतरची ही पहिलीच वेळ ठरली. पुरस्कारांच्या घोषणेला झालेल्या विलंबानंतरही क्रीडा मंत्रालयाने पुनर्मूल्यांकनासाठी उचललेल्या पावलाचे क्रीडा संघटनांकडून स्वागत होत आहे. अनेक क्रीडा संघटनांनी पात्र खेळाडूंनाच पुरस्कार मिळावा, अशी भूमिका घेतली होती.
खेळाच्या राजकारणामुळे अनेक गुणी खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहत होते. आता पुनर्मूल्यांकनामुळे ही तफावत दूर होईल आणि योग्य व्यक्तींना पुरस्कार मिळतील, असा विश्वास क्रीडा संघटनांकडून व्यक्त होत आहे. तसेच यावेळी विरोध करणार्या संघटनेच्या खेळाडूंना भविष्यात डावलले जाऊ नये, याचीही काळजी मंत्रालयाने घ्यावी, असे काही संघटकांनी सांगितले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत (१९६२) सुवर्णपदक जिंकणार्या भारतीय फुटबॉल संघाचे सदस्य असलेले आय. अरुमैनायागम हे ‘जीवनगौरव अर्जुन पुरस्कारा’चे एकमेव विजेते ठरले.
मंत्रालयाने यंदा तीन प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड केली आहे. बॉक्सिंग प्रशिक्षक छोटे लाल यादव हे त्यातील प्रमुख नाव आहे. ते महान बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या साहाय्यक प्रशिक्षकांच्या चमूचा भाग राहिले आहेत.
महाराष्ट्र खो-खो संघटनेचा यापूर्वी आक्षेप
पुरस्कारार्थींच्या नावांची शिफारस झाली तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणार्या महाराष्ट्राच्या सुयश गरगटे, अनिकेत पोटे आणि प्रियंका इंगळे या खो-खोपटूंना वगळण्यात आले होते. खो-खोसाठी निर्मला भाटी या महिला खेळाडूच्या नावाची शिफारस करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र खो-खो संघटनेने त्याला आक्षेप घेतला होता. ‘‘खो-खोला पुरस्कार दिला नाही तरी एकवेळ चालेल, पण तो चुकीच्या व्यक्तीला जायला नको,’’ अशी भूमिका त्यावेळी महाराष्ट्रखो-खो संघटनेचे सचिव चंद्रजित जाधव यांनी मांडली होती. ‘‘आमची ही भूमिका योग्य ठरली तरी खो-खोसारख्या भारतीय खेळाला पुरस्कार मिळाला नाही, याची खंत वाटते,’’ असे जाधव यांनी सांगितले.
विजेत्यांची यादी
’ अर्जुन पुरस्कार : तेजस्विन शंकर (ॲथलेटिक्स), प्रियंका गोस्वामी (ॲथलेटिक्स), नरेंदर बेरवाल (बॉक्सिंग), विदित गुजराथी (बुद्धिबळ), दिव्या देशमुख (बुद्धिबळ), धनुष श्रीकांत (मूकबधिर नेमबाजी), राजकुमार पाल (हॉकी), सुरजीत (कबड्डी), रुद्रांश खंडेलवाल
(पॅरा-नेमबाजी), एकता भ्यान (पॅरा-ॲथलेटिक्स), अरविंद सिंह (रोइंग), अखिल श्योरण (नेमबाजी), ट्रीसा जॉली (बॅडमिंटन),
गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन), लालरेमसियामी (हॉकी), मोहम्मद
अजमल (ॲथलेटिक्स), पूजा (कबड्डी)
’ अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) : आय. अरुमैनायागम (फुटबॉल)
’ द्रोणाचार्य पुरस्कार : परवीर सिंग (ॲथलेटिक्स), छोटे लाल यादव (बॉक्सिंग), नेहा चव्हाण (नेमबाजी)
’ द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) : धर्मेंद्र यादव (बॉक्सिंग), वीरेंदर कुमार (ॲथलेटिक्स)
महाराष्ट्राचे दोघे…
‘अर्जुन’ पुरस्काराच्या यादीत नागपूरची दिव्या देशमुख आणि नाशिकचा विदित गुजराथी या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार विजेत्या बुद्धिबळपटूंचा समावेश आहे. बुद्धिबळात एकाच वर्षी महाराष्ट्रातील पुरुष आणि महिला खेळाडूचा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. १९ वर्षीय दिव्याने गतवर्षी महिला विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला होता.
क्रिकेटपटू नाहीच : अर्जुन पुरस्काराच्या यादीत एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही. २०२३ मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर क्रिकेटपटूला या पुरस्कारासाठी निवडले गेलेले नाही.
