scorecardresearch

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : रुद्रांक्ष पाटीलचा सुवर्णवेध; स्केटिंगमध्ये सिद्धांत कांबळेची सोनेरी कामगिरी

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सोनेरी यशाला सुरुवात केली. नेमबाजीत रुद्रांक्ष पाटील, तर स्पीड स्केटिंग प्रकारात सिद्धांत कांबळेने सुवर्णपदक मिळविले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : रुद्रांक्ष पाटीलचा सुवर्णवेध; स्केटिंगमध्ये सिद्धांत कांबळेची सोनेरी कामगिरी
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : रुद्रांक्ष पाटीलचा सुवर्णवेध

वृत्तसंस्था, अहमदाबाद : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सोनेरी यशाला सुरुवात केली. नेमबाजीत रुद्रांक्ष पाटील, तर स्पीड स्केटिंग प्रकारात सिद्धांत कांबळेने सुवर्णपदक मिळविले. कबड्डीत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरी गाठली. अ‍ॅथलेटिक्समध्येही महाराष्ट्राच्या धावपटूंनी चमक दाखवली. कुस्तीत मात्र महाराष्ट्राच्या पदरी अपयश पडले. खो-खोमध्येही दोन्ही संघांनी विजयी सुरुवात केली.

कुमार गटातील जागतिक विजेता नेमबाज रुद्रांक्षने शुक्रवारी ३६व्या राष्ट्रीय स्पर्धेतील महाराष्ट्राचे पहिले सुवर्णपदक पटकावले. ठाण्याच्या रुद्रांक्षने १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत अचूक वेध साधताना १७ गुणांसह सोनेरी यश मिळविले. रुद्रांक्षची कामगिरी निश्चितपणे युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे, असे मुख्य प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी सांगितले. तसेच सिद्धांत कांबळेने स्पीड स्केटिंग प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. सिद्धांतने १० किमीची ही शर्यत १६ मिनिटांत पूर्ण केली. तसेच पेयर्स व्हॅलेममध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू अरहन जोशी आणि जिनेशने सुवर्ण कामगिरी केली. याच गटामध्ये दर्श शिंदे आणि आरेशने रौप्यपदक पटकावले.

रग्बीत रौप्यपदकावर समाधान

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला रग्बी संघांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष गटात हरयाणा संघाने महाराष्ट्राचा पराभव केला. महिला गटाच्या अंतिम फेरीत ओडिशा संघाने महाराष्ट्रावर मात केली.

कबड्डी : दोन्ही संघ अंतिम फेरीत

कबड्डीत महाराष्ट्राच्या महिला संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात तमिळनाडूला ४५-२५ असे पराभूत करून अंतिम फेरीत धडक दिली. महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात २७-०८ अशी भक्कम आघाडी घेतली होती. उत्तरार्धात शेवटी आणखी एक लोण देत ही आघाडी वाढवत मोठा विजय साजरा केला. हिमाचलने दुसऱ्या उपांत्य हरयाणाचा अत्यंत चुरशीच्या लढतीत २७-२७ अशा बरोबरीनंतर २८-२७ असा पराभव केला. निधी शर्माने शेवटच्या चढाईत बोनस गुण घेत हिमाचलचा विजय साकारला. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने तमिळनाडूचे आव्हान ४५-२५ असे सहज परतवून लावले. मध्यंतरालाच २७-८ अशी आघाडी घेऊन त्यांनी जणू सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. महाराष्ट्राकडून असमल इनामदार, अरकम यांचा खेळ उल्लेखनीय झाला.  सुवर्णपदकासाठी त्यांची गाठ उत्तर प्रदेशशी पडेल. त्यांनी विश्रांतीच्या १९-१८ अशा निसटत्या आघाडीनंतर सेनादलाचे आव्हाने ४३-२७ असे मोडून काढले. उत्तरार्धात सेनादलाचा प्रतिकार थंडावला होता.

खो-खो : महाराष्ट्राची विजयी सलामी

महाराष्ट्राच्या महिला खो-खो संघाने यजमान गुजरातचा एक डाव आणि ६ गुणांनी पराभव करून आपल्या मोहिमेस विजयी सुरुवात केली. या लढतीत महाराष्ट्र महिला संघाने गुजरात संघावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. महाराष्ट्र महिला संघाच्या प्रियांका भोपी, सोमेश सुतार, रेश्मा राठोड, प्रियांका इंगळे, शीतल मोरे, ऋतुजा खरे, दीपाली राठोड व संपदा मोरे यांनी लक्षवेधक कामगिरी बजावली. पुरुष गटात अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्राने गुजरातवर २८-२६ असा दोन गुण व सहा मिनिटे राखून विजय मिळवला. या लढतीत महाराष्ट्राकडून अक्षय भांगरे, हृषिकेश मुर्चावडे, लक्ष्मण गावस, अविनाश देसाई, सुयश गरगटे, प्रतीक वाईकर, रामजी कश्यप या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली.

कुस्तीत अपयश

कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या सूरज आसवलेला वेगवान लढतीत कर्नाटकच्या प्रशांत गौडकडून पराभव पत्करावा लागला. फ्री-स्टाईलच्या ९७ किलो गटात महाराष्ट्राच्या पृथ्वीराज पाटीलला पहिल्याच फेरीत सेनादलाच्या नासिर याच्याविरुद्ध हार मानावी लागली. ग्रीको रोमन प्रकारातील ६७ किलो विभागात महाराष्ट्राच्या विनायक सिद्धला दुसऱ्या फेरीत हरयाणाच्या अंशु कुमारने नमवले. ८७ किलो गटात महाराष्ट्राच्या शिवाजी पाटीलचाही दुसऱ्या फेरीत हरयाणाच्या सुनील कुमारकडून पराभव झाला.

अ‍ॅथलेटिक्समध्ये खेळाडूंची चमक

महाराष्ट्राच्या प्रणव गुरव, जय शहा व किरण भोसले यांनी १०० मीटर धावण्याच्या शर्यतीची अंतिम फेरी गाठली. तिहेरी उडीत महाराष्ट्राच्या कृष्णा सिंगला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याने १५.७६ मीटर्सपर्यंत उडी मारली. हातोडाफेकीत शंतनू उचले दहावा आला. त्याने ५८.१० मीटपर्यंत हातोडाफेक केली. कार्तिक करकेरा १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तेरावा आला.

टेनिसमध्येही आगेकूच

महाराष्ट्र टेनिसच्या पुरुष व महिला संघांनी अंतिम फेरीत स्थान मिळविले. महाराष्ट्राने पुरुषांच्या उपांत्य फेरीत कर्नाटक विरुद्ध २-१ असा विजय मिळविला. महाराष्ट्राकडून चौदा वर्षीय खेळाडू मानस धामणे याने या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.  महिलांनी सातत्यपूर्ण कामगिरी ठेवताना उपांत्य फेरीत तामिळनाडूचा २-० असा पराभव केला.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे. या यशामुळे आता मला आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळेल. 

– रुद्रांक्ष पाटील

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या