अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला संघाने गटातील तीनही सामने जिंकले, तर पुरुष संघाला अखेरच्या साखळी सामन्यात सेनादलाकडून पराभव पत्करावा लागला. महिला संघाने बुधवारी तिसऱ्या सामन्यात बिहारचे आव्हान ३६-२० असे परतवले. या सामन्यात विश्रांतीला महाराष्ट्राकडे १५-१४ अशी केवळ एका गुणाची आघाडी होती. उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून आलेल्या सायली केरिपाळेच्या बचावामुळे सामन्यात महाराष्ट्राने उचल घेतली आणि त्यानंतर पूजा यादवच्या अष्टपैलू खेळामुळे विजय मिळविला. पूजाने चढाई चमक दाखवताना बचावात पाच पकडीही केल्या. सोनाली शिंगटे, स्नेहल शिंदे यांच्या चढाया आणि अंकिता जाधवचा बचावही महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक ठरला. उपांत्य फेरीत महाराष्ट्रासमोर तमिळनाडूचे आव्हान असेल. दुसऱ्या उपांत्य लढतीत हिमाचल प्रदेश-हरयाणा आमनेसामने येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राच्या पुरुष संघाला अखेरच्या साखळी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सेनादलाने महाराष्ट्रावर ४८-३८ अशी मात केली. या पराभवामुळे महाराष्ट्रासमोर आता उपांत्य फेरीत बलाढय़ हरयाणाचे आव्हान असेल. दुसरी उपांत्य लढत सेनादल आणि उत्तर प्रदेश यांच्यात होईल.

रग्बीत महाराष्ट्राची दमदार सुरुवात

रग्बी सेव्हन्स प्रकारात महाराष्ट्राच्या महिला संघाने पहिल्याच दिवशी दोन विजयांची नोंद केली. महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांनी गुजरातचा धुव्वा उडवला. महिला संघाने गुजरातचा ६२-०, तर पुरुष संघाने ७३-० असा पराभव केला. त्यापूर्वी पहिल्या सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने दिल्लीला १९-१० असे पराभूत केले होते. महाराष्ट्राच्या पुरुष संघाला पहिल्या सामन्यात सेनादलविरुद्ध १४-७ अशा आघाडीनंतर १४-१४ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन सोहळा

टेबल टेनिस, कबड्डी आणि रग्बी खेळांच्या स्पर्धाना सुरुवात झाली असली, तरी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा आज, गुरुवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सोहळय़ात गुजरातच्या संस्कृतीचे दर्शन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पीव्ही सिंधू, नेमबाज गगन नारंग यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National sports tournament maharashtra kabaddi team semi finals women team ysh
First published on: 29-09-2022 at 01:06 IST