क्रोएशिया आणि नेदरलँड्सने रविवारी त्यांचा नेशन्स लीगचा शेवटचा सामना जिंकून पुढील वर्षीच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. क्रोएशियाने ऑस्ट्रियाला ३-१ ने पराभूत करून अ-१ गटात अव्वल स्थान पटकावले. नेदरलँड्सने बेल्जियमचा १-० ने पराभव केला आणि १६ गुणांसह अ-४ गटात अव्वल स्थान पटकावले. त्याचवेळी नेशन्स लीगमधील महत्त्वाचा आणि गतविजेता संघ फ्रान्सचा डेन्मार्ककडून ०-२ असा पराभव झाला. मात्र, ऑस्ट्रियाच्या पराभवामुळे फ्रान्स संघ लीगमधून बाहेर जाण्यापासून वाचला, तर ऑस्ट्रियाचा संघ दुसऱ्या श्रेणीत पोहोचला.

कतारमध्ये २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सहभागी संघांसाठी हा शेवटचा सामना होता. विश्वचषकामध्ये नेदरलँडचा संघ इक्वेडोर आणि सेनेगलच्या गटात आहे. फ्रान्स आणि डेन्मार्क पुन्हा कतारमध्ये भेटतील, त्यांच्या गटात ट्युनिशिया आणि ऑस्ट्रेलिया देखील समाविष्ट आहेत.

मॉड्रिचने क्रोएशियाला चांगली सुरुवात करून दिली

क्रोएशियाचा ३७ वर्षीय मिडफिल्डर लुका मॉड्रिकसाठी विश्वचषक ही शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असू शकते. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने सहाव्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. तीन मिनिटांनंतर ऑस्ट्रियाचा मिडफिल्डर क्रिस्टोफ बाउमगार्टनरच्या हेडरने साधलेल्या गोलसोबत बरोबरी केली होती. यानंतर क्रोएशियाकडून फॉरवर्ड मार्को लिवाजा (६९व्या मिनिटाला) आणि सेंट्रल डिफेंडर डेजान लोवरेन (७२वे) यांनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला. विश्वचषकात क्रोएशियाचा संघ बेल्जियम, कॅनडा आणि मोरोक्को या गटात आहे.

उत्तरार्धात एमबाप्पेचे प्रयत्न अपयशी ठरले

डेन्मार्कने क्रोएशियापेक्षा एक गुण कमी घेत १२ गुणांसह गटात दुसरे स्थान मिळवले, ज्यात त्यांनी घरच्या मैदानावर फ्रान्सला २-० ने पराभूत केले. डेन्मार्कच्या विजयात स्ट्रायकर कॅस्पर डॉल्बर्गने ३३ व्या मिनिटाला आणि मिडफिल्डर अँड्रियास स्कोव्ह ओस्लेनने ३९व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला २-० अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. स्टार स्ट्रायकर किलियन एमबाप्पेने दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्ससाठी गोल करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू गोलपोस्टपर्यंत जाऊ शकला नाही. फ्रान्सच्या संघाला गटात केवळ एक सामना जिंकता आला आणि पाच गुणांसह तिसरे स्थान पटकावले. सहा सामन्यांत फ्रान्सने पाच गोल केले, तर सात गोल अंगावर घेतले.

नेदरलँडसाठी व्हर्जिलने गोल केला

बेल्जियमला ​​तीन गोलने विजय आवश्यक होता मात्र त्यांना नेदरलँड्सकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला. लिव्हरपूलचा बचावपटू व्हर्जिल व्हॅन डायकने ७३व्या मिनिटाला नेदरलँड्सच्या विजयातील एकमेव गोल केला. अ-४ गटातील आणखी एका सामन्यात, रॉबर्ट लेवांडोस्कीच्या पोलंड संघाने वेल्सचा १-० असा पराभव केला. पोलंडसाठी कॅरोल स्विडर्स्कीने ५७व्या मिनिटाला गोल केला. ६४ वर्षांत पहिल्यांदाच वेल्सचा संघ यावेळी विश्वचषकात खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना २१ नोव्हेंबरला अमेरिकेशी होणार आहे. नेशन्स लीगमध्ये, गटातील विजेता संघ अंतिम चारमध्ये प्रवेश करतो.

उपांत्य फेरीसाठी हंगेरी आणि पोर्तुगालला फक्त ड्रॉची गरज आहे

पुढील वर्षी होणाऱ्या नेशन्स लीगच्या उपांत्य फेरीसाठी अजून दोन संघ पात्र ठरतील. अ-३ गटात, हंगेरी आणि इटली या सामन्यातील विजेता अंतिम चारमध्ये प्रवेश करेल. मात्र, अव्वल स्थानावर राहण्यासाठी हंगेरीला फक्त ड्रॉची गरज आहे. तर अ-२ गटात मंगळवारी स्पेन आणि पोर्तुगाल यांच्यात अखेरचा साखळी सामना होणार आहे. पोर्तुगालचा संघ सध्या १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. स्पेनला शेवटच्या चारमध्ये पोहोचण्यासाठी विजय मिळवावाच लागेल, तर पोर्तुगालला सामना केवळ ड्रॉ झाला तरी देखील चालणार आहे.