IND vs AUS: विजयी फटका मारण्याआधी ऋषभ पंत काय म्हणाला होता? सैनीने सांगितला ‘तो’ किस्सा

चेंडू खेळल्यावर पंत जोरात ओरडला, “पळ…”

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका २-१ने जिंकली आणि इतिहास रचला. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झालेले असूनही भारताच्या नव्या दमाच्या खेळाडूंनी सामना जिंकवून दिला. चौथ्या डावात ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने ९१ तर चेतेश्वर पुजाराने ५६ धावांची खेळी केली. पण ऋषभ पंतची फटकेबाज खेळी खऱ्या अर्थाने निर्णायक ठरली. आपली विकेट वाचवून त्याने भारताला विजय मिळवून दिला. विजयी फटका खेळताना पंतसोबत नवदीप सैनी नॉन-स्ट्राईकवर होता. त्याने या फटक्याआधी नक्की काय घडलं याबद्दलचा एक किस्सा सांगितला.

Video: क्वारंटाइन धमाल… अजिंक्य रहाणेचा लेकीसोबत भन्नाट डान्स

“पहिल्यांदाच मी ऋषभ पंतसोबत फलंदाजी करत होतो. मला त्याची फलंदाजी पाहून खूप मजा येत होती. तो आम्हाला सामना जिंकवून देणार याची मला खात्री होती. शार्दुल ठाकूर बाद झाल्यावर मी फलंदाजीसाठी गेलो आणि पंतला विचारलं की काय करायचं? त्याने मला स्पष्टपणे सांगितलं, ‘काही करू नकोस. फक्त सांगेन तेव्हा जोरात धाव घे. आणि उगाच जोखीम घेऊ नकोस.’ त्यानंतर पंत क्रीजमध्ये गेला आणि पुन्हा माझ्याजवळ आला आणि तेव्हा म्हणाला, ‘तू काळजी करू नकोस. मी बघून घेतो काय करायचं ते…”, असा किस्सा सैनीने टीओआईशी बोलताना सांगितला.

शाहिद आफ्रिदीला ‘युएई’मध्ये प्रवेशास नकार; विमानतळावरच रोखलं…

“पंतने जेव्हा फटका मारला तेव्हा तो जोरात माझ्याकडे बघून ओरडला, ‘पळ’. मला अंदाज होताच की तो धाव काढण्यासाठी चेंडू टोलवणार. चेंडू मारल्यावर त्याच्या ओरडण्यातून मला इतकंच कळलं की मला जमेल तितकं वेगाने धावायचं आहे. त्यामुळे मी चेंडू कुठे गेलाय हे न पाहता पळत सुटलो. जेव्हा पंत धावायचा थांबला आणि विजय साजरा करू लागला तेव्हा मला समजलं की आम्ही जिंकलोय”, असं सांगत सैनीने त्या ऐतिहासिक क्षणाला उजाळा दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Navdeep saini reveals what rishabh pant said before hitting the winning runs in brisbane gabba test vjb