न्यूझीलंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना आज

कसोटी मालिकेत न्यूझीलंडला पूर्णत: निष्प्रभ केल्यानंतर एकदिवसीय प्रकारातही भारतीय संघाने दमदार सलामी दिली. राजधानी दिल्लीत होणाऱ्या लढतीत न्यूझीलंडला नमवत वर्चस्व गाजवण्यासाठी भारतीय संघ आतुर आहे.

धरमशाला येथील लढतीत विराट कोहलीने संयमी अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. दिल्लीत घरच्या मैदानावर कोहलीकडून चाहत्यांना शतकाची अपेक्षा आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे मुंबईकर सलामीवीर मोठी खेळी करण्यासाठी आतुर आहेत. सुरेश रैना अद्यापही तंदुरुस्त नसल्याने मनीष पांडेला आणखी एक संधी मिळणार आहे. केदार जाधव आणि महेंद्र सिंग यांच्यावर वेगवान खेळींची जबाबदारी आहे.

ट्वेन्टी-२० प्रकारात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंडय़ाने धरमशाला लढतीत पदार्पण करताना ३ बळींसह आपली छाप उमटवली. उमेश यादव, अमित मिश्रा यांनीही टिच्चून मारा केला. कामचलाऊ गोलंदाज केदार जाधवनेही दोन बळी मिळवत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. दिल्लीतही न्यूझीलंडच्या फलंदाजांना तो अडचणीचा ठरू शकतो.

धरमशाला येथील सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली होती. केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्यावर संयमी खेळी करण्याचा भार आहे. रॉस टेलरने संपूर्ण दौऱ्यात लौकिकाला साजेशी खेळी केलेली नाही. विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळणाऱ्या कोरे अ‍ॅण्डरसनला योगदान द्यावे लागणार आहे. टीम साऊदीने फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीतही उपयुक्तता सिद्ध करणे न्यूझीलंडसाठी आवश्यक आहे. मॅट हेन्री आणि ट्रेंट बोल्ट यांना संधी मिळू शकते. मार्टिन गप्तीलचे अपयश न्यूझीलंड संघाची डोकेदुखी आहे. गप्तीलला वगळल्यास फलंदाजीसह फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अँटॉन डेव्हविचला संधी मिळू शकते. मिचेल सँटनर आणि इश सोधी या फिरकी जोडगोळीवर धावा रोखण्याबरोबच विकेट्स मिळवण्याची जबाबदारी आहे.

खेळपट्टी

दिल्लीची खेळपट्टी संथ आणि धिम्या खेळपट्टीसाठी ओळखली जाते. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे आव्हानात्मक आहे. फिरकीपटूंना कोटलाची खेळपट्टी पोषक ठरू शकते. थंडीच्या हंगामात दवाचा मुद्दा फिरोझशाह कोटलाच्या खेळपट्टीवर निर्णायक ठरतो.

संघ

  • भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, अमित मिश्रा, अक्षर पटेल, उमेश यादव, धवल कुलकर्णी, जयंत यादव, मनदीप सिंग.
  • न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, मार्टिन गप्तील, रॉस टेलर, ल्युक राँची, मिचेल सँटनर, इश सोधी, जेम्स नीशाम, कोरे अ‍ॅण्डरसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, अँटॉन डेव्हविच, डग ब्रेसवेल, मॅट हेन्री, ब्रॅडले वॉटलिंग.