ऋषिकेश बामणे

भारत हा क्रीडा प्रकारांचे सामने खेळण्यापेक्षा ते पाहण्यासाठी आणि खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी फारसा ओळखला जातो. मात्र महाराष्ट्राशी नाते सांगणाऱ्या कॅरम आणि खो-खो या दोन्ही खेळांच्या स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीविषयी आजही उदासीनता आहे. गेल्या काही वर्षांत या दोन्ही खेळांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने यशाची शिखरे सर केल्याचे निदर्शनास आले आहे. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय खो-खो संघांचे दुहेरी यश आणि फेडरेशन चषक आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेतील भारतीयांचे निर्विवाद वर्चस्व, या दोन्ही घटनांतून भारताची या खेळांमधील मक्तेदारी स्पष्ट होत असली तरी त्याच्या वास्तववादी आत्मपरीक्षणाची गरज आहे.

महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांत, शहरांत-गावांत खेळले जाणारे हे दोन्ही खेळ ऑलिम्पिकच्या वाटचालीत प्रचंड पिछाडीवर आहेत. हे लक्ष्य गाठण्यापूर्वी त्यांना राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धाचा अडथळा ओलांडावा लागणार आहे. कोणत्याही खेळाच्या प्रचार-प्रसारात त्या क्रीडा प्रकाराची आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा मालिका अथवा लीग महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. विश्वचषकापर्यंत मजल मारणाऱ्या कॅरमला शासन-दरबारी खेळ सिद्ध करण्यातही बऱ्याच अडचणी येतात. खो-खोने आता किमान २०२२च्या ‘एशियाड’पर्यंत मजल मारली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर जेतेपदाचा टेंभा मिरवणाऱ्या या क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धात्मक पातळीवर भारताला आव्हान देऊ शकणारे संघ आहेत का? हे खेळ सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रक्षेपणाचे पाठबळ त्यांच्याकडे आहे का? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे. त्यामुळे या एकतर्फी आंतरराष्ट्रीय स्पर्धापेक्षा राज्य अजिंक्यपद स्पर्धाची चुरस अधिक रंगतदार ठरेल, असे कुणीही सांगू शकेल. त्यासाठी महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या कानाकोपऱ्यात कॅरम आणि खो-खोचा प्रचार-प्रसार करण्याचे शिवधनुष्य संघटनांना पेलावे लागणार आहे. त्याशिवाय फक्त महाराष्ट्रापुरतीच खेळाची प्रगती मर्यादित न ठेवता जागतिक पातळीवर सर्वागीण विकासासाठी या खेळांच्या महासंघातर्फे कोणती पावले उचलण्यात येतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

कॅरमही प्रगतीच्या वाटेवर!

गेल्या काही वर्षांत कॅरमने महाराष्ट्राबरोबरच देशातही झपाटय़ाने प्रगती केली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील वर्चस्व, संघटनेच्या अ‍ॅपला लाभणारा प्रतिसाद आणि एकापेक्षा एक उदयोन्मुख खेळाडू हे याचे उत्तम उदाहरणे आहेत. मात्र, कॅरम या खेळाची वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी लवकरच संघटनेतर्फे एक उपक्रम राबवण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या जर्सीचा रंग ठरलेला असतो, त्यानुसार कॅरममध्येही आम्ही भारतासाठी विशिष्ट रंगाची जर्सी तयार करणार आहोत. यामुळे खेळाडूंनाही वेगळी ओळख मिळेल. थेट प्रक्षेपणाविषयी बोलायचे झाल्यास, कबड्डी अथवा क्रिकेटमध्ये भारताचा एका वेळी एकच सामना रंगत असल्याने चाहत्यांना त्याच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद लुटता येतो. परंतु कॅरममध्ये एकाच वेळी १०-१२ बोर्डावर खेळाडू खेळत असतात. त्यामुळे भविष्यात जेव्हा कॅरमची प्रीमियर लीग सुरू होईल, त्या वेळी प्रेक्षकांचा विचार करून कोणत्या सामन्याचे थेट प्रक्षेपण करावे आणि करू नये, हे ठरवणे महत्त्वाचे असेल. विशेषत: फेडरेशन चषकामध्ये भारत, श्रीलंका वगळता मालदीवने केलेली कामगिरी उल्लेखनीय होती. त्याचप्रमाणे जर्मनी, कॅनडाच्या खेळाडूंनीही भारतीय खेळाडूंना कडवी झुंज दिली. अन्य खेळांनाही जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवण्यासाठी वेळ लागला. त्याचप्रमाणे कॅरम ही प्रगतीच्या वाटेवर आहे. तसेच महाराष्ट्रात आता कॅरमच्या अकादम्या सुरू झाल्या असून जितक्या लवकर अन्य राज्यांतही अकादम्यांची संख्या वाढेल, त्या वेळी नक्कीच भारताला आणखी गुणवान खेळाडू मिळतील आणि त्यांच्या कामगिरीची दखलही घेतली जाईल.

– अरुण केदार, महाराष्ट्र कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष

भारतासाठी धोक्याचा इशारा!

खो-खो हा खेळ जसा वेगवान आहे, त्याचप्रमाणे त्याच्या प्रगतीचा आलेखही वेगाने उंचावतो आहे. दक्षिण आशियाई स्पर्धेतील भारताचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले. त्याचप्रमाणे जानेवारीत रंगणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठीही भारताच्या दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. परंतु जागतिक पातळीवर खो-खोच्या प्रगतीने मला थक्क केले. आगामी काही वर्षांत श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ या तीन संघांचा खेळ इतका उंचावलेला असेल की भारताला विजेतेपद मिळवणे कठीण जाईल, हे मी खात्रीने सांगू शकतो. महाराष्ट्रात सातत्याने उत्तमोत्तम खेळाडू घडवले जातात. परंतु भारतातूनही आपल्याला अधिकाधिक कौशल्यवान खेळाडूंची गरज आहे. यामध्ये खेळाडूंची कामगिरी आणि चाहत्यांचा उत्साह यांची मोलाची भूमिका आहे. विशेषत: महिलांनी एकदा २४-२५ वय ओलांडले की त्या खेळापासून दुरावतात. परंतु आता खेळाडूंना व्यवसाय आणि रोख पारितोषिके उपलब्ध असल्याने विवाहानंतरही महिला नक्कीच खेळू शकतात. त्याशिवाय अल्टिमेट खो-खो लीगमध्येही लवकरच महिलांचा समावेश करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाची समस्या खो-खोला भेडसावत असली तरी, यावरही तोडगा म्हणून झारखंडला झालेल्या उपकनिष्ठ स्पर्धेपासून महासंघाच्या अधिकृत संकेतस्थळावर सामन्यांचा आनंद अनुभवण्याची सोय चाहत्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. अल्टिमेट लीगमुळे खो-खोचा योग्य प्रचार-प्रसार होईल, अशी आम्हाला आशा आहे.

– चंद्रजीत जाधव, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव

 

rushikesh.bamne@expressindia.com