२०२३मध्ये पाकिस्तानमध्ये होणारी आशिया चषक स्पर्धा ५० षटकांची असेल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी सांगितले आहे. दुबईहून परतल्यानंतर ते पीसीबी डिजिटलशी बोलत होते. दुबईत त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांची भेट घेतली.

राजा म्हणाले, ” आशिया क्रिकेट काऊन्सिलने (एसीसी) मान्य केले आहे, की पाकिस्तानमध्ये होणारी ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाईल. याच वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला समोर ठेऊन याचे आयोजन केले आहे. आम्ही पाकिस्तानमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक आहोत आणि मला विश्वास आहे, की हा एक सुनियोजित कार्यक्रम असेल कारण चाहत्यांना हेच हवे आहे”, असे राजा यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. एसीसीने पुढील वर्षी श्रीलंकेत होणारी स्पर्धा २० षटकांच्या स्वरुपात खेळली जाईल याची पुष्टी केली आहे.

हेही वाचा – T20 World Cup: भारताची सलामीची जोडी ठरली; ‘हे’ दोन खेळाडू करणार ओपनिंग

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीबद्दल रमीझ राजा म्हणाले, “मी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याशी एसीसीच्या बैठकीच्या वेळी भेटलो. आम्हाला क्रिकेट बंधन निर्माण करण्याची गरज आहे, या खेळातून राजकारण दूर असले पाहिजे यावर माझा विश्वास आहे. पाकिस्तान-भारत क्रिकेटचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बरेच काम करण्याची आवश्यकता आहे, परंतु दोन बोर्डांमध्ये चांगले संबंध असले पाहिजेत, त्यानंतर आपण किती दूर जाऊ शकतो ते पाहू शकतो. त्यामुळे एकूणच, आम्ही चांगली चर्चा केली.”