Neeraj Chopra Panipat mansion details and CWG 2026 final: भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा हे आज जगभरातील क्रीडाप्रेमींसाठी परिचित नाव आहे. ऑलिम्पिक स्पर्धा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा अशा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकल्यामुळे त्याला ‘गोल्डन बॉय’ म्हणूनही ओळखलं जातं. सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्येही नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची आशा आहे.

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये नीरजने इतिहास रचत ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला आशियाई भालाफेकपटू होण्याचा मान मिळवला होता. सध्या तो कॉमनवेल्थ गेम्स २०२६मध्ये सहभागी असून, यश वीर सिंह आणि रोहित यादव यांच्यासह भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. संपूर्ण देशाचं लक्ष नीरजच्या कामगिरीकडे लागलं असताना, त्याच्या क्रीडा कारकिर्दीइतकंच चर्चेत असलेला हरियाणातील आलिशान बंगलाही अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.

नीरज चोप्राच्या हरियाणातील आलिशान बंगल्याची खास झलक

नीरज चोप्राचा जन्म हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा या छोट्याशा गावात झाला. लहानपणी त्याचं वजन जास्त असल्यामुळे शाळेत अनेकदा त्याची चेष्टा केली जायची. याच कारणामुळे त्याने जिममध्ये जाण्यास सुरुवात केली आणि तिथेच त्याला भालाफेक या खेळाची प्रेरणा मिळाली. पुढे याच खेळात त्याने जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल केलं.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हरियाणातील नीरज चोप्राचा आलिशान बंगला सुमारे ३० कोटी रुपयांचा आहे. तीन मजली असलेल्या या भव्य बंगल्याचा दर्शनी भाग अतिशय आकर्षक असून प्रवेशद्वारावर ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे संस्कृत वाक्य कोरलेलं आहे, ज्याचा अर्थ ‘संपूर्ण जग हेच एक कुटुंब आहे’ असा होतो. त्याखाली सोनेरी अक्षरांत ‘Chopra’s’ असं नावही लिहिलेलं आहे.

नीरज चोप्राच्या या आलिशान बंगल्याचा बाह्य भाग पांढऱ्या आणि बेज रंगाच्या आकर्षक छटांनी सजवण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला त्याच्या आलिशान कारचा ताफा पाहायला मिळतो. संपूर्ण बंगल्याची सजावट पांढऱ्या आणि उबदार तपकिरी रंगसंगतीत करण्यात आली असून, त्यातून आधुनिकतेसोबतच साधेपणाही जाणवतो.

नीरजच्या काकांनी २०२४ मध्ये सांगितलं होतं की, त्याला लक्झरी कार आणि हाय-एंड बाइक्सची विशेष आवड आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याने आपल्या पाळीव कुत्र्याचं नावही ‘टोकियो’ ठेवलं आहे. व्हिडिओमध्ये नीरजच्या घरात ट्रॅक्टर्सचाही संग्रह दिसून येतो. अनेक एकरमध्ये पसरलेल्या या बंगल्याभोवती हिरवागार लॉन, नीटनेटकी झाडं आणि मजबूत संरक्षक भिंत आहे. घरातील इंटिरिअर साधं, आधुनिक आणि नीरजच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं आहे.

या बंगल्यात नीरजने आपली पदकं आणि ट्रॉफींसाठी स्वतंत्र दालन तयार केलं आहे. भिंतींवर विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक स्वीकारतानाचे त्याचे फोटो लावलेले आहेत. नीरजचं हे घर त्याच्या अथक मेहनतीचं, समर्पणाचं आणि यशस्वी क्रीडा प्रवासाचं प्रतीक मानलं जातं.