वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताचा दोन ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राच्या दुखापतीची चिंता कायम आहे. सरावादरम्यान घोट्याचे अस्थिबंध (लिगामेंट) फाटल्यामुळे त्याला पुढील महिन्यात होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेसह उर्वरित संपूर्ण हंगामाला मुकावे लागणार आहे. यामुळे आशियाई स्पर्धेतील भारताच्या पदक मोहिमेलाही मोठा धक्का बसला आहे.
गेल्याच आठवड्यात लोझान डायमंड लीगमध्ये हंगामातील सर्वोत्तम कामगिरी (८८.०५ मीटर) केल्यानंतर लगेचच ही दुखापत झाल्याचे नीरजने म्हटले आहे. ‘‘खूप कठोर परिश्रमानंतर अखेर लोझानमधील सर्वोत्तम फेकीमुळे मला आवश्यक गती मिळत असल्यासारखे वाटत होते. दुर्दैवाने, त्यानंतर लगेचच सरावादरम्यान माझ्या घोट्याचे लिगामेंट फाटले. माझ्या डॉक्टरांशी आणि साहाय्यकांशी चर्चा केल्यानंतर, या हंगामातील उर्वरित स्पर्धांमध्ये न खेळण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’’ असे नीरजने समाजमाध्यमाद्वारे जाहीर केले.
‘‘हरवलेली लय शोधण्याच्या खूप जवळ आलो होतो. परंतु पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. सध्या तरी पूर्ण लक्ष शंभर टक्के तंदुरुस्त होण्याकडे असेल,’’ असे २८ वर्षीय नीरजने सांगितले. ‘‘पुन्हा एकदा जायबंदी होणे हे नक्कीच निराशाजनक आहे. लय गवसत असतानाच नवा अडथळा आला. अर्थात, असे अडथळे प्रवासाचा भागच असतात. आता पूर्ण बरे होऊन अधिक मजबूत होऊन पुनरागमन करणार आहे. तुम्हा सर्व चाहत्यांचा पाठिंबा मला नेहमीच बळ देत राहील,’’ असे नीरजने शनिवारी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या दुखापतीमुळे ब्रुसेल्स येथे होणार्या डायमंड लीगच्या अंतिम टप्प्यातही त्याला खेळता येणार नाही. तो या स्पर्धेसाठी पात्र ठरल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले होते. अलीकडेच त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. गेल्या वर्षी त्याला पाठीची दुखापत झाली होती.
सातत्यपूर्ण कामगिरी
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नीरज चोप्राकडून पदकाची सर्वाधिक अपेक्षा होती. त्यामुळे त्याची माघार हा देशासाठी मोठा धक्का मानला जात आहे. टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरजला या हंगामाच्या उत्तरार्धात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता. मात्र, लोझानमधील त्याच्या कामगिरीने तो पुन्हा एकदा लयीत येत असल्याचे संकेत दिले होते. नीरज गेल्या काही वर्षांत जागतिक भालाफेकीत अत्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणार्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने २०२१ मध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक, तर २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलेे. याशिवाय २०२३ मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
भारताच्या पदकसंख्येला फटका?
- नीरज चोप्राच्या माघारीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकसंख्येला फटका बसणे अपेक्षित आहे. या स्पर्धेला तीन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असला, तरी त्यापूर्वीच काही खेळाडू विविध कारणांमुळे स्पर्धेबाहेर झाल्याने भारतासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
- भारतीय ऑलिम्पिक संघटना किंवा भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) जायबंदी खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत. दुखापतीमुळे आशियाई स्पर्धेला मुकणारी सध्या तरी क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज ही दुसरी खेळाडू आहे.
- उत्तेजक सेवन प्रकरणातील कारवाईमुळे काही प्रमुख खेळाडूंनाही स्पर्धेला मुकावे लागणार आहे. यामध्ये लांबपल्ल्याचा धावपटू अभिषेक पाल, कुस्तीपटू मुकुल दहिया, दीपांशू, हेप्टॅथलॉनमधील माजी आशियाई विजेती स्वप्ना बर्मन, ज्युडोपटू अरुण कुमार आणि तुलिका मान, बॉक्सर लक्ष्य, तसेच धावपटू चिराग चिकारा यांचा समावेश आहे.
- यातील महत्त्वाची बाब म्हणजे, यजमान जपानने सहभागाबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यामुळे आता केवळ दुखापतीमुळेच एखाद्या देशाला आपल्या संघातील खेळाडूमध्ये बदल करता येणार आहे. अन्य कोणत्याही कारणामुळे खेळाडू बदलता येणार नाही.
