टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला आता परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने ३८४ जणांना शौर्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. याच यादीत नीरज चोप्रालाही स्थान मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते हे शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये १२ शौर्य चक्र, २९ परम विशिष्ट सेवा पदके, ४ उत्तम युद्ध सेवा पदके, ५३ अति विशिष्ट सेवा पदके, १३ युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे.

हेही वाचा – नांदेडच्या सुपुत्राचा सन्मान; झारखंडचे अपर पोलीस महासंचालक संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकच्या अंतिम स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत ट्रॅक अँड फील्डमध्ये देशासाठी पहिले पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी नेमबाज अभिनव बिंद्राने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.

भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत पाच मेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeraj chopra awarded the param vishisht seva medal on republic day adn
First published on: 25-01-2022 at 16:53 IST