Neeraj Chopra First Reaction after Win Silver Medal in Olympic 2024: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदकाला गवसणी घालत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक मिळवले. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं रौप्य पदक आहे. दरम्यान, या कामगिरीनंतर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्याने सुवर्णपदक हुकल्याचे दुख: असल्याची भावना व्यक्त केली. तसेच येणाऱ्या काळात खेळात नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. हेही वाचा - Neeraj Chopra Won Silver: नीरज चोप्राची रौप्यपदकाला गवसणी, ऐतिहासिक थ्रो करत पॅरिसमध्ये भारताला मिळवून दिलं पाचवं पदक नेमकं काय म्हणाला नीरज चोप्रा? “देशासाठी आपण जेव्हाही पदक जिंकतो, तेव्हा आनंद होतो. रौप्य पदक जिंकलो, त्याचा आनंद आहेच. मात्र, सुवर्ण पदक हुकल्याचे दुख:ही कुठं तरी मनात आहे. पण आता स्वत:मध्ये सुधारणा करण्याची वेळ आहे. याबाबत टीम बरोबर बसून चर्चा करेन”, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने दिली. “यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वच भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. कुणीही टोकियो ऑलिम्पिकमध्यल्या पदकांची तुलना या ऑलिम्पिमकमधल्या पदकांशी करू नये, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडूने त्यांच्या सर्वोत्तम खेळ केला आहे. प्रत्येक वेळी पदकांशी संख्या वाढेलच असं नसतं. पण येणाऱ्या काळात नक्कीच पदकांच्या संख्येत वाढ होईल, असा मला विश्वास आहे”, असेही तो म्हणाला. यावेळी त्याला सुवर्णपदक हुकल्याबाबत विचारलं असता, “देशवासियांना माझ्याकडून सुर्वणपदकाची अपेक्षा होती. याची मला जाणीव आहे. पण प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. काल अर्शद नदीमचा दिवस होता. मी माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र, मला यश मिळालं नाही. खेळात विजय-पराजय होत राहतात. मात्र, येणाऱ्या काळात मी नक्कीच माझ्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन”, असं त्याने सांगितले. हेही वाचा - पाकिस्तानने ऑलिम्पिकमध्ये किती पदकं पटकावली आहेत तुम्हाला माहितेय का?… दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात नीरज चोप्राने अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक मिळवले. यंदाच्या मोसमातील ८९.४५ हा त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. या रौप्यपदकासह त्याने त्याचं दुसरं ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे. नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक ८९.४५ मीटर भालाफेक केली, तर अर्शद नदीमने ९२.९७ मीटरसह ऑलिम्पिक विक्रम केला. या सामन्यात ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटर थ्रोसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.