Neeraj Chopra Mother Reacts on Arshad Nadeem : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकून भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ मीटरवर भाला फेकला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले. टोक्यो ऑलम्पिकमध्ये सुवर्णवेध घेणाऱ्या नीरज चोप्राला यावेळी रौप्यपदक मिळाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान नीरजच्या पालकांचीही प्रतिक्रिया समोर आली. नीरज चोप्राच्या आईने आपल्या मुलाच्या रौप्यपदकाबद्दल आनंद व्यक्त करत असताना पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दलही भाष्य केले. नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यानंतर त्याची आई सरोज देवी एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, नीरजला रौप्यपदक मिळाले असले तरी आम्ही खूप आनंदी आहोत. हेही सुवर्णपदक मिळण्यासारखेच आहे. तो जखमी होता, तरीही त्याने चांगली कामगिरी केली, याबद्दल आम्हाला आनंद आहे. तसेच पाकिस्तानच्या नदीमने सुवर्णपदक जिंकले, त्याबद्दलही आनंद वाटतो. सर्वच खेळाडू मला मुलासारखे आहेत. हे वाचा >> Arshad Nadeem: पाकिस्तानच्या सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमचा संघर्ष; बांधकाम मजूराचा मुलगा, एकेकाळी जेवणही मिळत नव्हतं अर्शदचा दिवस होता, नीरजच्या वडिलांची प्रतिक्रिया एएनआय वृत्तसंस्थेने नीरज चोप्राच्या वडिलांचीही प्रतिक्रिया घेतली आहे. त्यात ते म्हणाले की, प्रत्येकाचा दिवस असतो, आज पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा दिवस होता. आमच्या मुलाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे, त्याचा आम्हाला अधिक आनंद आणि अभिमान वाटतो. नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तगडी सुरुवात केली होती. अंतिम सामन्यात नीरज चोप्राला थोडा संघर्ष करावा लागला, मात्र शेवटचा निकाल त्याच्या बाजूने लागला. हे ही वाचा >> रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये…” This is the most heartwarming moment on the internet today.Neeraj Chopra's mother shows true grace, saying, "I'm happy with the silver. Happy for gold medalist (Arshad Nadeem), Everyone works hard to get there."A lesson in humility and love. ♥️ pic.twitter.com/WIagidAiGt— زماں (@Delhiite_) August 8, 2024 सोशल मीडियावर नीरज चोप्राच्या आईचे कौतुक सुवर्णपदक जिंकणाराही माझा मुलगाच आहे, अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे नीरज चोप्राच्या आईचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. खासकरून पाकिस्तानमधील एक्स युजर एएनआयवरील प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर करत असून नीरज चोप्राच्या आईने दाखविलेली खिलाडु वृत्ती आणि माणुसकीचे कौतुक करत आहे. आपल्या मुलाचा दुसरा क्रमांक आला तरी पहिल्या क्रमाकांवर असलेल्या मुलाबाबतही तिला माया वाटावी, हे माणुसकीचे उत्तम उदाहरण असल्याचे अनेकजण बोलत आहेत.