लुसाने : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी आणखी एक ऐतिहासिक यश मिळवले. डायमंड लीग मालिकेतील अखेरच्या स्पर्धेत त्याने ८९.०८ मीटर भालाफेक करताना सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे नीरज डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.

डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. स्नायूच्या दुखापतीमुळे नीरजने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती. या कालावधीत मिळालेल्या विश्रांतीने नीरज डायमंड लीगच्या अखेरच्या स्पर्धेसाठी ताजातवाना राहिला. पहिल्याच प्रयत्नात त्याने ८९.०८ मीटर भालाफेक करताना सुवर्णपदक निश्चित केले.

नीरजच्या कारकिर्दीमधील ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च कामगिरी ठरली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८५.१८ मीटर अंतर गाठले. नीरजने तिसरा प्रयत्न केला नाही. चौथ्या प्रयत्नाला त्याच्याकडून चूक झाली. नीरजने पाचवा प्रयत्न केला नाही. अखेरच्या सहाव्या प्रयत्नात त्याने ८०.०४ मीटर भालाफेक केली.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या जेकहब वॅडलेशने ८५.८८ मीटर भालाफेक करून दुसरा क्रमांक मिळवला. अमेरिकेच्या कर्टिस थॉम्प्सनने (८३.७२ मीटर) कांस्यपदक मिळवले. डायमंड लीग मालिकेतील दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेनंतर नीरज दुसऱ्या स्थानावर होता. या टप्प्यात ग्रेनाडाचा अ‍ॅंडरसन पीटर्स ८९.९४ मीटरच्या कामगिरीसह विजेता ठरला होता. या महिन्यात ग्रेनाडातच बोटीवर झालेल्या हल्ल्यात तो जखमी झाला होता. त्यातून अँडरसन अजून बरा झालेला नाही. नीरज जागतिक स्पर्धेत तिसऱ्या प्रयत्नांपर्यंत पदकाच्या शर्यतीत नव्हता. येथे मात्र पहिल्या प्रयत्नापासून नीरजने अखेपर्यंत आपली आघाडी राखली होती.

नीरज चोप्रा दुसरा भारतीय

डायमंड लीग मालिकेत पहिल्या तीन जणांत स्थान मिळवणारा नीरज दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी थाळीफेक प्रकारात विकास गौडा २०१२ आणि २०१४ मध्ये दुसऱ्या, तर शांघाय आणि युजेनी येथील स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर होता. नीरज पहिल्या स्थानावर आला आहे. नीरज आता ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या डायमंड लीगच्या अखेरच्या स्पर्धेत खेळेल. नीरज २०२३ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीदेखील पात्र ठरला आहे.

हा विजय देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. स्नायूच्या दुखापतीमुळे मी राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली. यंदाच्या हंगामाची अखेर अशीच वेदनादायक होणार असे वाटत होते. सुदैवाने दुखापत गंभीर नव्हती. त्यामुळे विश्रांतीनंतर मी या स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होईन असा विश्वास होता. सरावासाठी केवळ १० दिवस मिळाले. विजेतेपदाचा आनंद निश्चित आहे. आता दुखापतीशिवाय हंगामाची अखेर होण्याकडे माझे लक्ष असेल. या वर्षी तीन वेळ ८९  मीटपर्यंत पोहोचलो हे महत्त्वाचे आहे.

नीरज चोप्रा