Nepal Beat Scotland in T20 World Cup 2026: नेपाळ आणि स्कॉटलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-२० विश्वचषकातील सामना खेळवला गेला. या सामन्यात नेपाळ संघाने स्कॉटलंड संघावर ७ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. नेपाळ संघाचा यंदाच्या टी-२० विश्वचषकातील हा पहिला विजय आहे. यासह नेपाळने २०१४ नंतर पहिल्यांदा टी-२० वर्ल्डकपमध्ये सामना जिंकत इतिहास घडवला आहे. नेपाळच्या या विजयाचा हिरो दीपेंद्र सिंह ऐरी ठरला, ज्याने अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडला अपसेटच्या उंबरठ्यावर नेणाऱ्या नेपाळ संघाचा हा यंदाच्या वर्ल्डकपमधील अखेरचा सामना होता आणि हा सामना जिंकत संघ सकारात्मक पद्धतीने बाहेर पडला आहे.
स्कॉटलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना १७० धावांचा डोंगर उभारला. स्कॉटलंडने कमालीची सुरूवात केल्यानंतर नेपाळने सोमपालच्या गोलंदाजीवर शानदार पुनरागमन केलं. तर प्रत्युत्तरात नेपाळने १९.२ षटकांत हे लक्ष्य गाठलं. दीपेंद्र सिंह ऐरीची अर्धशतकी खेळी संघाच्या विजयाचा टर्निंग पॉईंट ठरली.
स्कॉटलंडने दिलेल्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कमालीची सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी कुशल भूर्तेल व असिफ शेख यांनी ७४ धावांची भागीदारी रचली. भुर्तेलने ३५ चेंडूत ४ षटकार व एका चौकारासह ४३ धावांची खेळी केली. तर असिफ ३३ धावा करत बाद झाला. यानंतर कर्णधार रोहित पौडेल १६ धावा करत लवकर बाद झाला. यानंतर दिपेंद्र सिंह ऐरी व गुलशन झा यांनी संघाचा डाव सावरला. दीपेंद्र सिंह ऐरीने २३ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह शानदार अर्धशतक झळकावलं. तर गुलशन झा ने दीपेंद्रला चांगली साथ दिली आणि संघाला विजय मिळवून दिला.
गुलशन झा ने १७ चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह २४ धावा केल्या. तर गुलशन व दीपेंद्रने ३६ चेंडूत ७३ धावांची मॅचविनिंग भागीदारी साकारली. अखरेच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. स्कॉटलंडकडून फक्त मायकेल लीस्कने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय इतर गोलंदाजांची नेपाळने धुलाई करत विजय निश्चित केला.
नेपाळने या सामन्यात नाणेफेक जिंकत स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. स्कॉटलंडची फलंदाजीला सुरूवात चांगली झाली. सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचली. जॉर्ज मुन्से २७ धावा करत झेलबाद झाला. तर मायकेल जॉन्स ४५ चेंडूत ८ चौकार व ३ षटकारांसह ७१ धावांची खेळी करत बाद झाला. जॉन्स व मॅकमुलेन यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. यानंतर नेपाळने सामन्यात पुनरागमन करत स्कॉटलंडच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही. यासह स्कॉटलंडच्या संघाने २० षटकांत ७ बाद १७० धावांची खेळी केली.
नेपाळकडून पहिल्या डावात सोमपाल कामीने ३ विकेट्स घेतल्या. तर नंदन यादवने २ आणि रोहित पौडेल व कुशाल भुर्तेल यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.

