Nepal Team Creates History in T20I: नेपाळ क्रिकेट संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न भूतो न भविष्यती असा विक्रम केला आहे. टी-२० इतिहासात जगातील कोणताच संघ जी कामगिरी करू शकला नाही, ती कामगिरी आता नेपाळ संघाने करून दाखवली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पुरुष पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात नेपाळने चीनविरुद्ध विक्रमी धावसंख्या उभारत विक्रमांच्या पुस्तकात एक नवीन अध्याय लिहिला. नेपाळने २० षटकांत ३१३ धावा करून इतिहास घडवला.
नेपाळ आणि चीन यांच्यातील सामना सिंगापूरमध्ये खेळवला गेला. या सामन्यातीच नाणेफेक नेपाळने जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि चीनच्या गोलंदाजांची धुलाई केली. नेपाळ संघाने आपल्या निर्धारित २० षटकांत फक्त २ गडी गमावून ३१३ धावांचा डोंगर उभा केला. या विक्रमी कामगिरीचा हिरो सलामीवीर कुशल भुर्तेल होता, ज्याने स्फोटक शतक झळकावून सामना एकतर्फी केला.
कुशल भुर्तेलच्या या विक्रमी खेळीच्या बळावर चीनविरूद्ध सामन्यात नेपाळने ३१३ धावांचा डोंगर उभारला. यासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वेळा ३०० अधिक धावा करणारा चीन हा जगातील पहिला संघ ठरला आहे. कुशल भुर्तेलने आपल्या खेळीदरम्यान एकाच षटकात सहा षटकार खेचत क्रिकेट जगताला चकित केलं. त्याच्या या वादळी शतकामुळे नेपाळने चिनी गोलंदाजांची शाळा घेतली आणि धावसंख्या ३००च्या पुढे नेली. भुर्तेलने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं आणि नेपाळला ३१३ धावा उभारण्यास मदत केली.
नेपाळच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा संघाने ३०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये, आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान, नेपाळने मंगोलियाविरुद्ध ३१४/३ धावा करत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिला संघ बनण्याचा विक्रम केला होता. आता नेपाळ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनदा ३००+ धावा करणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. आतापर्यंत केवळ चार संघांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, परंतु दोनदा हा पराक्रम करणारा नेपाळ हा एकमेव संघ आहे.
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५ सर्वोच्च धावसंख्या
३४४/४ – झिम्बाब्वे विरुद्ध गांबिया
३१४/३ – नेपाळ विरुद्ध मंगोलिया
३१३/२ – नेपाळ विरुद्ध चीन
३०८/१ – जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रिया
३०४/२ – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
३१४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना चीन सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसत होता. त्यांची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली आणि केवळ शेंजियान झेंगच झुंज देऊ शकला. त्याने १५ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या, तर इतर चारही फलंदाज एकही धाव करू शकले नाहीत. नेपाळच्या गोलंदाजांनीही उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण चिनी संघाला १९.२ षटकांत केवळ ९२ धावांवर सर्वबाद केलं. अशाप्रकारे, नेपाळने हा सामना २२१ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
