शेवटच्या षटकात १० धावा करण्याचं आव्हान नेपाळसमोर होतं. लोकेश बाम विरुद्ध सॅम करन अशा लढाईत अनुभवी सॅम करनने बाजी मारली. अटीतटीच्या लढतीत इंग्लंडने अवघ्या ४ धावांनी विजय मिळवला. लोकेश बामने २० चेंडूत ३९ धावांची झुंजार खेळी केली. इंग्लंडने दिलेल्या १८४ धावांचा पाठलाग करताना नेपाळचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. सॅम करनने सगळा अनुभव पणाला लावत शेवटच्या षटकात चौकार किंवा षटकार जाऊ दिला नाही.

नेपाळने आसिफ शेखला झटपट गमावलं. त्यानंतर कुशल भुर्टेल आणि रोहित पौडेल यांनी वेगवान भागीदारी केली. भुर्टेल १७ चेंडूत २९ धावांची खेळी करून बाद झाला. यानंतर रोहितला देवेंद्र सिंग एरीची साथ मिळाली. ३४ चेंडूत ३९ धावांची खेळी करून रोहित बाद झाला. देवेंद्रने सूत्रं हाती घेतली. २९ धावांत ६ चौकार आणि एका षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. धावगतीचं आव्हान वाढत असताना लोकेश बामने चौकार, षटकारांची पखरण करत सामना नेपाळच्या बाजूने फिरवला. जोफ्रा आर्चरच्या चौथ्या षटकात नेपाळने २२ धावा चोपून काढल्या.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने जेकब बेथेल आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १८४ धावांची मजल मारली. भरवशाचा अनुभवी जोस बटलर २६ धावा करून तंबूत परतला. फिल सॉल्ट झटपट बाद झाला. टॉम बॅन्टनचा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न अंगलट आला. ब्रूक आणि बेथेल यांनी चांगली भागीदारी केली. बेथेलने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली.

बेथेल बाद झाल्यानंतर ब्रूकने सूत्रं हाती घेतली. नेपाळने नियमित अंतरात विकेट्स घेतल्या. विल जॅक्सने १८ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारासह नाबाद ३९ धावांची खेळी केली. ब्रूकने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. नेपाळतर्फे दिपेंद्र सिंग एरी आणि नंदन यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

१८ चेंडूत ३९ धावांची खेळी करणाऱ्या विल जॅक्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.