मुंबई : सोमपाल कामीच्या (२५ धावांत ३ बळी) भेदक माऱ्यानंतर अनुभवी दीपेंद्र सिंह ऐरीच्या (२३ चेंडूंत नाबाद ५०) आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर नेपाळने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात स्कॉटलंडवर सात गडी व चार चेंडू राखून विजय मिळवला. नेपाळचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले, तरी या विजयाने त्यांनी शेवट गोड केला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळनेही समाधानकारक सुरुवात केली. सलामीवीर कुशल भुर्टेल (४३) आणि आसिफ शेख (३३) यांनी पहिल्या गड्यासाठी ७४ धावा जोडल्या. लिस्कने भुर्टेलला बाद करत ही भागीदारी मोडीत काढली. यानंतर आसिफलाही लिस्कने बाद करत संघाच्या अडचणी वाढवल्या. कर्णधार रोहित पौडेलही (१६) माघारी परतल्यानंतर नेपाळची अवस्था ३ बाद ९८ अशी झाली. मात्र, दीपेंद्र सिंह ऐरीने संघासाठी निर्णायक खेळ केला.

अखेरच्या पाच षटकांत संघाला विजयासाठी ५९ धावांची आवश्यकता होती. नेपाळने १६व्या षटकात २० धावा काढत आपल्यावरील दडपण दूर केले. या षटकात ऐरीने दोन षटकारही लगावले. अखेरच्या तीन षटकांत संघाला केवळ २८ धावांची गरज होती. मात्र, १८व्या षटकात ब्रॅड व्हीलने सुरुवातीचे तीन चेंडू चांगले टाकले. मग ऐरीने षटकार व चौकार लगावत नेपाळला विजयासमीप आणले. नेपाळला अखेरच्या षटकात पाच धावांची आवश्यकता होती. ऐरीने एक धाव काढल्यानंतर गुलशन झा (नाबाद २४) याने चौकार मारत नेपाळला विजय मिळवून दिला. ऐरी व गुलशन झा यांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य ७३ धावांची निर्णायक भागीदारी केली.

त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्कॉटलंडने दमदार सुरुवात केली. त्यांच्याकडून जॉर्ज मुन्से (२७) आणि मायकल जोन्स (४५ चेंडूंत ७१) यांनी पहिल्या गड्यासाठी ८० धावा जोडल्या. मुन्सेला पौडेलने बाद करीत ही भागीदारी मोडीत काढली. यानंतर जाॅर्जने ब्रँडन मॅकमुलेनसह (२५) संघाचा डाव सावरला. जोन्स माघारी परतल्यानंतर स्कॉटलंडच्या इतर फलंदाजांना फारसे योगदान देता आले नाही. जोन्सने आपल्या खेळीत आठ चौकार व तीन षटकार लगावले. अखेरीस मार्क वॉटने (नाबाद १०) धावा करीत स्कॉटलंडला १७० धावांपर्यंत पोहोचवले.

संक्षिप्त धावफलक

स्कॉटलंड : २० षटकांत ७ बाद १७० (मायकल जोन्स ७१, जॉर्ज मुन्से २७, ब्रँडन मॅककुलेन २५; सोमपाल कामी ३/२५, नंदन यादव २/३४) पराभूत वि. नेपाळ : १९.२ षटकांत ३ बाद १७१ (दीपेंद्र सिंह ऐरी नाबाद ५०, कुशल भुर्टेल ४३, आसिफ शेख ३३; मायकल लिस्क ३/३०).

सामनावीर : दीपेंद्र सिंह ऐरी

नेपाळ संघाकडून चाहत्यांचे आभार

नेपाळ संघाचे सर्व सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाले. प्रत्येक सामन्याला नेपाळच्या चाहत्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यासाठी स्टेडियमवर जवळपास १९ हजार चाहत्यांची उपस्थिती होती. त्यामुळे स्पर्धेतील पहिला विजय मिळवल्यानंतर संपूर्ण नेपाळ संघाने स्टेडियमची फेरी मारत उपस्थित चाहत्यांचे आभार मानले.