गे ले दोन मोसम फॉम्र्युला-वनवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या रेड बुलच्या सेबेस्टियन वेटेलने सलग तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले तरी त्यासाठी त्याच्या कौशल्याची चांगलीच कसोटी पाहणारे हे वर्ष ठरले. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी ही किमया करणारा तो सर्वात युवा ड्रायव्हर ठरला. ही करामत करून त्याने अर्जेटिनाचा जुआन मॅन्युएल फॅन्गिओ आणि जर्मनीचा मायकेल शूमाकर या दिग्गज ड्रायव्हर्सच्या पंक्तीत स्थान मिळवले. अखेरच्या शर्यतीपर्यंत रंगलेला विश्वविजेतेपदाचा थरार, वेटेलने पटकावलेले तिसरे जगज्जेतेपद आणि मायकेल शूमाकरने फॉम्र्युला-वनला केलेला अलविदा.. यामुळे हा मोसम सर्वात उत्कंठावर्धक, तांत्रिकदृष्टय़ा तंत्रज्ञांची कसोटी पाहणारा आणि सर्वात जास्त स्पर्धात्मक ठरला.
चांगली कार, अफाट पैसा मोजण्याची तयारी आणि सर्वोत्तम तंत्रज्ञांचा फौजफाटा ज्यांच्याकडे असेल, असेच संघ फॉम्र्युला-वनवर वर्चस्व गाजवतात, हा कित्ता या वर्षी मोडून निघाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. २०११ मोसमात १९ शर्यतींपैकी १५ पोल पोझिशन आणि ११ जेतेपदे पटकावणाऱ्या वेटेल आणि रेड बुल संघाची मक्तेदारी या वर्षीही पाहायला मिळेल, असे अंदाज सर्वानी बांधले होते. पण मोसमाची सुरुवात झाल्यानंतर वेटेलचे वर्चस्व मोडून काढत सात वेगवेगळ्या ड्रायव्हर्सनी पहिल्या सात शर्यतींत जेतेपद पटकावण्याची किमया केली. जेन्सन बटन (मॅकलॅरेन संघ), फर्नाडो अलोन्सो (फेरारी), निको रोसबर्ग (मर्सिडिझ), सेबेस्टियन वेटेल (रेड बुल), पास्तोर माल्डोनाल्डो (विल्यम्स), मार्क वेबर (रेड बुल) आणि लुइस हॅमिल्टन (मॅकलॅरेन) या सात ड्रायव्हर्सनी बाजी मारल्यामुळे ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपचा फैसला अखेरच्या शर्यतीत रंगणार, हे सर्वाच्या लक्षात आले होते. पहिल्या टप्प्यात फर्नाडो अलोन्सोने तीन आणि लुइस हॅमिल्टनने दोन शर्यतींचे जेतेपद पटकावून ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये आघाडी घेतली होती. लोटसच्या किमी रायकोनेन याला एकही शर्यत जिंकता आली नसली तरी कामगिरीत सातत्य राखल्यामुळे तोसुद्धा जगज्जेतेपदाच्या शर्यतीत होता.
वेटेल मात्र ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपच्या शर्यतीत बराच मागे पडला होता. मोसमाच्या दुसऱ्या टप्प्यात सात शर्यती शिल्लक असताना वेटेलने गिअर टाकत सलग चार शर्यती जिंकल्या आणि फर्नाडो अलोन्सोला गाठले.
मोसमातील शेवटून दुसऱ्या अमेरिकन ग्रां. प्रि. शर्यतीत वेटेलच्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब होणार होते, पण वेटेलने पोल पोझिशन पटकावूनही लुइस हॅमिल्टनने सुरेख कामगिरी करून वेटेलला दुसऱ्या क्रमांकावर टाकले. त्यामुळे विश्वविजेतेपदाची रंगत अखेरच्या ब्राझीलियन ग्रां. प्रि. शर्यतीत पाहायला मिळाली. हॅमिल्टन आणि रायकोनेन हे जगज्जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकल्यामुळे अलोन्सो आणि वेटेल यांच्यात चुरस पाहायला मिळाली. पण वेटेल अलोन्सोपेक्षा १३ गुणांनी आघाडीवर असल्याने त्याचेच पारडे जड मानले जात होते.
ब्राझिलियन ग्रां. प्रि.मध्ये अनेक नाटय़मय प्रसंग पाहायला मिळाले. शर्यतीची सुरुवातच अपघाताने झाली. पहिल्या लॅपमधील (फेरी) चौथ्या वळणाजवळ वेटेलच्या कारला अपघात झाला. वारंवार पिट-स्टॉपमध्ये विश्रांती घेऊनही वेटेलने आपले आव्हान कायम राखले. त्यातच शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या लुइस हॅमिल्टन आणि निको हल्केनबर्ग यांच्यात भीषण अपघात झाला. त्याचा फायदा उठवत अलोन्सो दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि वेटेलला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पण तीन गुणांच्या फरकाने वेटेलने अलोन्सोला मागे टाकले आणि सलग तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचा मान पटकावला.
इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीचा दुसरा मोसमही यशस्वी ठरला. ६० हजारपेक्षा जास्त चाहत्यांनी बुद्ध इंटरनॅशनलच्या सर्किटवर हजेरी लावल्याने भारतातही मोटारस्पोर्ट्सची क्रेझ जबरदस्त आहे, हे दाखवून दिले. वेटेलने सलग दुसऱ्यांदा ही शर्यत जिंकून भारतवासीयांची मने जिंकली. या मोसमात लोटस आणि सौबेर या संघांनी केलेल्या सुरेख कामगिरीमुळे सहारा फोर्स इंडिया या भारतीय संघाला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अद्यापही अव्वल तीन जणांमध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिलेल्या फोर्स इंडियाने या मोसमासाठी जय्यत तयारी केली होती. पण किंगफिशर गाळात बुडाल्याचा फटका विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या फोर्स इंडिया संघाला बसला. कमी बजेट असतानाही आम्ही सुरेख कामगिरी करू शकतो, हे लोटस आणि सौबेर या संघांनी दाखवून दिले. फोर्स इंडियाचे ड्रायव्हर निको हल्केनबर्ग आणि पॉल डी रेस्टा यांनी अनुक्रमे ११वे आणि १४वे स्थान पटकावत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. हल्केनबर्गने संघाला रामराम ठोकल्यानंतर आता २०१३ मोसमासाठी एड्रियन सुटीलला पुन्हा सामील करून घेण्यासाठी फोर्स इंडियाचे प्रयत्न सुरू आहेत. फॉम्र्युला-वनमधील एकमेव भारतीय ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन याला हिस्पानिया संघातर्फे खेळताना एकही गुण पटकावता आला नाही. मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीत पटकावलेले १५वे स्थान ही कार्तिकेयनची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी. म्हणूनच पुढील मोसमासाठी कार्तिकेयनच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
९१ शर्यतींचे जेतेपद, ६८ वेळा पोल पोझिशन आणि सात वेळा विश्वविजेता ठरलेला महान ड्रायव्हर मायकेल शूमाकरची निवृत्ती, ही चाहत्यांना धक्का देणारी होती. २००६मध्ये निवृत्त झाल्यानंतर पुन्हा २००९मध्ये फॉम्र्युला-वनमध्ये पुनरागमन करणाऱ्या शूमाकरसारख्या ड्रायव्हरला एकही शर्यत जिंकता आली नाही, ही त्याच्या दृष्टीने खराब कामगिरीच म्हणावी लागेल. मात्र या मोसमात युरोपियन ग्रां. प्रि.दरम्यान तिसरा क्रमांक पटकावत त्याने पोडियमवर स्थान मिळवले. आता शूमाकरसारख्या दिग्गज ड्रायव्हरचा खेळ पाहता येणार नाही, याची खंत चाहत्यांना आहे.