निळ्याशार पाण्याचा तलाव आणि मागे हिरव्याकंच डोंगररांगा अशा आल्हाददायी वातावरणात मुंबईचा संघ रणजी करंडक स्पर्धेचा पुढचा सामना खेळणार आहे. मुंबईने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या हंगामातल्या पहिल्या लढतीत उत्तराखंडवर डावाच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. मुंबईच्या उष्ण दमट वातावरणातून त्यांनी हिमाचल प्रदेशातलं बिलासपूर गाठलं आहे. सोशल मीडियावर या निसर्गरम्य मैदानाचे फोटो, रील आणि व्हीडिओ शेअर केले जात आहेत.

निसर्गाची मुक्त उधळण असणारं स्टेडियम म्हणून याच राज्यातल्या धरमशाला क्रिकेट स्टेडियमची ख्याती आहे. हिमालयाच्या पायथ्याशी हे स्टेडियम वसलं आहे. बर्फाच्छादित हिमालयावरून येणाऱ्या गार वाऱ्यांची साथ संध्याकाळच्या वेळेस अनुभवता येणारं असं हे स्टेडियम आहे.

धरमशालाला टक्कर देईल असं स्टेडियम चाहत्यांच्या प्रतीक्षेत आहे. धरमशाला मैदानात पावसाचं पाणी साचल्याने खेळपट्टी योग्य स्थितीत नाही. या कारणास्तव मुंबईचा सामना बिलासपूर इथल्या लुहूनू क्रिकेट मैदानावर होणार आहे. एवढ्या कमी कालावधीत रणजी ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी खेळपट्टी आणि मैदान तयार करणं हे संयोजकांसमोरचं आव्हान होतं. मात्र त्यांनी मेहनत घेत सगळी सिद्धता केली आहे.

मैदानाच्या एका बाजूला गोविंद सागर तलाव आहे. निळ्याशार पाण्याची सोबत खेळाडूंना आहे. पाण्यामुळे वातावरणात गारवा राहण्याचीही शक्यता आहे. मैदानाच्या मागे डोंगररांग आहे. डोंगराच्या पायथ्याशी आणि सरोवराच्या काठाशी अशा आटपाट नगरी भवतालात मुंबईचा संघ खेळणार आहे.

हायब्रिड पद्धतीची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. नैसर्गिक गवताळावर कृत्रिम पॉलिमर फायबर अंथरण्यात आलं आहे. फलंदाज आणि गोलंदाज दोन्हींना साहाय्यकारी अशी ही खेळपट्टी असेल. दोन दशकं या मैदानाला मोठ्या लढतीची अपेक्षा आहे. १९९९ मध्ये लुहुनू इथे युवा संघाचा सामना खेळवण्यात आला. २००१-०२ रणजी हंगामात हिमाचल प्रदेश आणि दिल्ली यांच्यात इथे सामना झाला. पुढच्या वर्षी हिमाचलने हैदराबादविरुद्धची लढत इथे खेळली. मात्र त्यानंतर २४ वर्षात डोमेस्टिक क्रिकेटमधला कोणताही मोठा सामना इथे आयोजित करण्यात आलेला नाही.

मार्च २०२४ मध्ये हिटमॅन रोहित शर्मा तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विनंतीला मान देत लुहूनू इथल्या मैदानात आला होता. अंबानी कुटुंबीयांच्या सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर रोहित दिल्लीहून खाजगी हेलिकॉप्टरने बिलासपूर इथे दाखल झाला. त्यावेळी रोहितला पाहण्यासाठी मैदानात प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी भारतीय संघाचे तत्कालीन प्रशिक्षक राहुल द्रविडही उपस्थित होते. त्यांनी संसद खेल महाकुंभ ३.०चं उद्घाटन केलं. या दोघांनी टेनिस बॉल क्रिकेटचा एक छोटेखानी सामना खेळला.

भारत इंग्लंड कसोटी सामना काही तासांवर आला होता. मात्र तरीही रोहितने विनंतीचा मान राखला यासाठी ठाकूर यांनी त्याचं कौतुक केलं होतं. कसोटी सामन्याची तयारी असतानाही रोहित आवर्जून आला. या कार्यक्रमाला ७५,००० हून अधिक चाहते, खेळाडू उपस्थित होते.

हा कार्यक्रम आटोपून रोहित-राहुल बिलासपूर इथून धरमशाला इथे रवाना झाले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रोहित थेट हेलिकॉप्टरने भारतीय संघाच्या सराव सत्राला पोहोचला. सोशल मीडियावर रोहितच्या हेलिकॉप्टर एंट्रीची जोरदार चर्चा रंगली होती.

१९६०च्या दशकात सतलज नदीवर भाक्रा धरण उभारण्यात आलं. धरणामुळे जुनं बिलासपूर शहर कायमस्वरुपी पाण्याखाली गेलं. नव्या शहराची निर्मिती करण्यात आली. ते शहर म्हणजे लुहूनू. धरमशाला इथलं मैदान आणि वातावरण विहंगम असलं तरी तिथवर पोहोचणं वेळखाऊ आहे. लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने संघांना तिथे जाणं अवघड होतं. त्या तुलनेत बिलासपूरला जाणं सोयीचं आहे. कल्पनेतलं रम्य गाव असावं तसं हे शहर आहे. गोविंद सागर तलावाचं खोरं पार्श्वभूमीला आहे. सायबेरियन पक्षी या भागात येतात. वातावरण आल्हाददायक असतं.

क्रिकेट स्टेडियमच्या बरोबरीने अँडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्स आणि बोटिंग अशा पद्धतीने हा परिसर विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.