Net Worth Of Suryakumar Yadav: भारतीय संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव २०२६ हे वर्ष कधीच विसरू शकणार नाही. रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली आणि २०२६ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा मान मिळवून दिला. पण ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला कर्णधारपदासह संघातील स्थानही गमवावं लागलं. सध्या तो भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. मैदानावर चमकलेला सूर्या, आपल्या लाईफस्टाईलमुळेही नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान २०२६ मध्ये सूर्याची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या.
सूर्यकुमार यादवची एकूण संपत्ती किती?
माध्यमातील वृत्तानुसार, सूर्यकुमार यादवची एकूण संपत्ती अंदाजे ५५ कोटी रुपये इतकी आहे. ही रक्कम बीसीसीआयचा केंद्रीय करार, फ्रँचायझी क्रिकेट, जाहिरातीतून आणि गुंतवणुकीतून मिळते. सूर्यकुमार यादवच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात खूप उशिरा झाली, पण त्याने या कमी कालावधीत जास्त प्रसिद्धी मिळवली आहे.
सूर्यकुमार यादवला बीसीसीआयकडून किती पगार मिळतो?
बीसीसीआयकडून मिळणारं मानधन हे विविध श्रेणीत विभागण्यात आलं आहे. सूर्यकुमार यादवचा समावेश हा ब श्रेणीत करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला वर्षाला ३ कोटी रुपये मिळतात. या श्रेणीत अक्षर पटेल, कुलदीप यादव , ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वालसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
आयपीएलमधून किती कमाई होते?
सूर्यकुमार यादवने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २०१२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना केली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने ७० लाखांची बोली लावून त्याला आपल्या संघात स्थान दिलं. पण मुंबईने त्याला ३.२ कोटी मोजून पुन्हा एकदा आपल्या संघात स्थान दिलं. आता त्याला मुंबईकडून खेळण्यासाठी एकूण १६.३६ कोटी रुपये मिळतात.
आलिशान घर अन् जाहिरातीतून कोटींची कमाई
सूर्यकुमार यादवचे इंस्टाग्रामवर १.९ कोटी फॉलोवर्स आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, प्रत्येक डीलसाठी त्याला ६० ते ७० लाख रुपये मिळतात. यासह तो ड्रीम ११, जिओसिनेमा, रॉयल स्टॅग अंक बोल्ट ऑडिओसारख्या ब्रँड्सचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. २०२५ मध्ये सूर्या आणि त्याच्या पत्नीने मिळून देवनार येथील गोदरेज स्काय टेरेसमध्ये अंदाजे २१.११ कोटींचं घर घेतलं आहे.
