कॅन्सास सिटी : मुसळधार पावसातही नेदरलँड्स संघाने निर्विवाद वर्चस्व राखत अखेरच्या गट साखळी सामन्यात ट्युनिशियाचा ३-१ असा पराभव केला. तीनही सामन्यात नेदरलँड्सच्या परिपूर्ण नियोजनाने प्रतिस्पध्र्यांवर मात केली. आक्रमक आणि बचावफळीत सुरेख समन्वय त्यांच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले असून, आता त्यांचा कस लागेल. बाद फेरीत त्यांची गाठ मोरोक्कोशी पडणार आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासून ट्युनिशियाचा गेल्या काही आठवड्यांची खराब लय कायम राहिली. नेदरलँड्सच्या डेन्झेल डमफ्रिजने तिसर्याच मिनिटाला गोलपोस्टच्या दिशेने मारलेला चेंडू बाहेर काढण्याच्या नादात ट्युनिशियाचा कर्णधार एलिस स्खिरीने पाय लावला आणि चेंडू थेट त्यांच्याच जाळ्यात गेला. यानंतर सातव्या मिनिटाला २५ यार्डांवरून मिळालेल्या फ्री-किकवर ६ फूट ५ इंच उंचीच्या व्हर्जिल व्हॅन डायकने उत्कृष्ट हेडर मारत चेंडू पास केला.
यावर ब्रायन ब्रॉबीने कोणतीही चूक न करता ट्युनिशियाचा गोलरक्षक आयमेन डामेनला चकवून गोल केला आणि नेदरलँड्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ट्युनिशियाने ५४ व्या मिनिटाला हॅझेम मास्तौरीच्या कॉर्नर किकवरील गोलमुळे सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ६२ व्या मिनिटाला नेदरलँड्सच्या यान पॉल व्हॅन हेकेचा हेडर ट्युनिशियाच्या अनिस स्लिमानेच्या डोक्याला लागून गोलपोस्टमध्ये गेला.
जपान, स्वीडनची रोमहर्षक बरोबरी
आर्लिंग्टन : अखेरच्या साखळी सामन्यात सर्वस्व पणाला लावून खेळणार्या जपान आणि स्वीडन संघांदरम्यान अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेला सामना अखेर १-१ असा बरोबरीत सुटला. या बरोबरीसह दोन्ही संघांनी बाद फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या ६२ व्या मिनिटाला अँथनी एलांगाने पेनल्टी कक्षाच्या उजव्या कोपर्याबाहेरून डाव्या पायाने मारलेली अप्रतिम किक थेट गोलजाळ्यात गेली. त्याचा या स्पर्धेतील हा दुसरा गोल होता. या गोलच्या सहा मिनिटांपूर्वी (५६ व्या मिनिटाला), रित्सुच्या सुरेख पासवर डायझेन माएडाने पेनल्टी एरियात चेंडू डाव्या पायाने नियंत्रणात घेतला आणि स्वीडनचा गोलरक्षकतुर्कीयेला चकवून गोल करुन जपानला आघाडीवर नेले होते.
