आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांची नेहमी तुलना केली जाते. भारतीय संघाचं कर्णधारपद हातात आल्यापासून विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. गुरुवारी दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून विराट कोहलीचा सत्कार करण्यात आला. फिरोजशहा कोटला मैदानाला माजी दिवंगत मंत्री अरुण जेटली यांचं नाव देण्यात आलं. यावेळी मैदानातील एका पॅव्हेलियन स्टँडला विराटचं नाव देण्यात आलं. या सोहळ्याला दिल्लीच्या आजी-माजी खेळाडूंनी हजेरी लावली होती. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही विराट कोहलीचं कौतुक केलं.

“कोहलीला अजून खूप खेळायचं आहे. कारकिर्दीच्या मध्यावर त्याच्याबद्दल काही बोलणं योग्य ठरणार नाही पण त्याने आतापर्यंत भारतीय क्रिकेटला दिलेलं योगदान मोलाचं आहे. कोणीतरी सचिनने केलेले विक्रम इतक्या लवकर मोडेल याची मी कल्पनाही केली नव्हती. मात्र विराट सध्या एका वेगळ्याच फॉर्मात आहे.” कपिल देव यांनी विराट कोहलीची स्तुती केली.

दरम्यान या सोहळ्याला विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि संपूर्ण परिवार उपस्थित होता. आपल्या पतीचा मोठ्या पातळीवर होत असलेला सत्कार पाहून अनुष्कालाही आपले आनंदाश्रू रोखता आले नाही. विंडीज दौरा गाजवल्यानंतर भारतीय संघासमोर आता दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. १५ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.

अवश्य वाचा – खेळाशी प्रामाणिक राहा, कोणत्याही स्तरावर चांगली कामगिरी कराल – विराट कोहली