Who Is Monank Patel: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण २० संघ जेतेपदाची ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या २० संघांना ४ गटात विभागण्यात आलं आहे. भारतीय संघाचा स्पर्धेतील पहिला सामना ७ फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे आहे. तर अमेरिकेचं नेतृत्व युवा फलंदाज मोनांक पटेल करताना दिसून येणार आहे. एकेकाळी भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न पाहणारा मोनांक आता टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताविरुद्ध खेळताना दिसून येणार आहे.
टी -२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी सर्व संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मोनांक पटेलला भारताविरुद्ध खेळण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना मोनांक पटेल म्हणाला, “ भारतात येऊन वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण अमेरिकेकडून वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळेल असा विचार केला नव्हता.”
भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ ७ फेब्रुवारीला आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. अमेरिकेच्या संघातील बहुतांश खेळाडू हे भारतीय वंशांचे आहे. त्यामुळे अमेरिकेच्या खेळाडूंनाही भारतात खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे हे खेळाडू दमदार सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.
कोण आहे मोनांक पटेल?
टी – २० वर्ल्डकप स्पर्धेत अमेरिकेचं नेतृत्व करत असलेला मोनांक पटेल हा मूळचा भारतीय आहे. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून अमेरिकेच्या संघात स्थान मिळवणाऱ्या मोनांक पटेलने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याचा अनुभव पाहता, अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे. मोनांकने अंडर १९ क्रिकेटमध्ये गुजरात संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यादरम्यान त्याने अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहसारख्या स्टार खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर केला आहे. २०१३ मध्ये त्याने भारत सोडून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. २०१० मध्ये त्याला ग्रीन कार्ड मिळालं होतं.
मोनांकला गुजरातकडून रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळायची होती. पण त्याला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याने भारत सोडून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेला गेल्यानंतर त्याने क्रिकेट खेळण्यासह व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकलं. याबाबत बोलताना तो म्हणाला, “जेव्हा मी अमेरिकेला गेलो, त्यावेळी माझं टार्गेट केवळ क्रिकेट खेळणं नव्हतं. तर मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता.”

