scorecardresearch

महिला क्रिकेटच्या नव्या युगाला प्रारंभ, महिला प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात

महिला प्रीमियर लीगला (डब्ल्यूपीएल) शनिवारपासून सुरुवात होत असून महिला क्रिकेटच्या नवीन युगाचा प्रारंभ लीगच्या माध्यमातून होईल.

womens ipl
महिला क्रिकेटच्या नव्या युगाला प्रारंभ, महिला प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात

पहिल्या लढतीत मुंबईसमोर गुजरातचे आव्हान

पीटीआय, मुंबई : महिला प्रीमियर लीगला (डब्ल्यूपीएल) शनिवारपासून सुरुवात होत असून महिला क्रिकेटच्या नवीन युगाचा प्रारंभ लीगच्या माध्यमातून होईल. या लीगमुळे भारतातील महिला खेळाडूंना मोठय़ा खेळाडूंसह खेळण्याचा अनुभव मिळेल. गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघांदरम्यानच्या पहिल्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेत एकूण २१ सामने खेळले जातील.

मुंबई संघाचे नेतृत्व भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर करेल. तर गुजरातची जबाबदारी बेथ मूनीवर असेल. ‘डब्ल्यूपीएल’मध्ये दिग्गज खेळाडूंसह स्नेहा दीप्ती आणि जासिया अख्तरसारख्या नवख्या खेळाडूंकडेही अनेकांचे लक्ष असेल. जम्मू आणि काश्मीरची जासिया मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. हरमनप्रीत, स्मृती मनधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मा या भारताच्या खेळाडूंकडे सर्व जण लक्ष ठेवून असतील. या ट्वेन्टी-२० लीगची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. यामध्ये एकूण पाच संघ आणि ८७ खेळाडूंचा समावेश आहे. यामधील १५ वर्षांहून अधिक वयाच्या खेळाडूंना जगातील दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल. स्पर्धेतील सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये होतील.

‘डब्ल्यूपीएल’मध्ये पाचही संघांना एकूण ४,६६९ कोटी रुपयांना विकण्यात आले. यामध्ये अदानी समूहाने गुजरात संघाला १,२८९ कोटी रुपयांना खरेदी केले. खेळाडूंच्या लिलावावर पाच संघांनी एकूण ५९.५० कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे महिला खेळाडूंची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळेल. या लिलावात भारताची तारांकित फलंदाज स्मृतीला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (आरसीबी) संघाने ३.४० कोटी रुपयांना खरेदी केले आणि अपेक्षेनुसार तिला कर्णधार बनवण्यात आले. या संघात सोफी डिवाइन आणि अ‍ॅलिस पेरी यांचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्स (९१२.९९ कोटी रुपये) लीगमधील दुसरा सर्वात महागडा संघ आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हा संघ पुरुषांच्या पाच ‘आयपीएल’ विजेत्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल. हरमनप्रीतसह संघात इंग्लंडची नॅट स्किव्हर-ब्रंट आणि वेगवान गोलंदाज इसे वाँग, न्यूझीलंडची अमेलिया केर, दक्षिण आफ्रिकेची क्लोए ट्रायॉन, वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाज हेथर ग्राहमचा समावेश आहे.

बेथ मूनीच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स संघात हरलीन देओल, स्नेह राणा (उपकर्णधार) आणि अनुभवी सुषमा वर्माचा सहभाग आहे. त्यांच्याकडे अ‍ॅश्ले गार्डनर आणि जॉर्जिया वेअरहॅम, वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन आणि इंग्लंडची सोफिया डंकलेही आहे. भारताची माजी कर्णधार मिताली राज संघाची प्रेरक आणि सल्लागार आहे. यूपी वॉरियर्सने ऑस्ट्रेलियाची आक्रमक फलंदाज एलिसा हीलीला कर्णधार बनवले आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व मेग लॅनिंग करत असून त्यांच्याकडे जेमिमा व शफालीसारख्या फलंदाज आहेत.

उद्घाटन सोहळ्याला  दिग्गजांची उपस्थिती

‘डब्ल्यूपीएल’च्या पहिल्या सत्रासाठी शनिवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला  अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला सायंकाळी ५.३० वा. सुरुवात होईल. अभिनेत्री कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन या कार्यक्रमात सहभागी होतील. यासह कॅनेडियन रॅपर एपी ढिल्लोनही या कार्यक्रमात आपले सादरीकरण करेल.

  • वेळ, सायं. ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण, स्पोर्ट्स १८-१

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 01:00 IST