Why Football Rules are Changing: पूर्वी पाच दिवस (अगदी सुरुवातीला एक सुटीचा दिवसही असायचा, त्यामुळे सहा दिवस) चालणारे कसोटी क्रिकेट काळाच्या ओघात वेगवान होत होत टी-२० पर्यंत बदलले. आधी ६० षटकांचे एकदिवसीय सामने, मग ५० षटकांचे आणि नंतर दोन्ही संघांसाठी प्रत्येकी वीसच षटके असा क्रिकेटचा प्रवास झाला, तो अधिक प्रेक्षक मिळविण्यासाठी, त्यातील मनोरंजनमूल्य वाढविण्यासाठी आणि पर्यायाने जाहिराती, प्रसारण हक्क अशा विविध माध्यमांतून पैशांची मोठी उलाढाल शक्य व्हावी, यासाठी तीन-चार तासांच्या चित्रपटांचीही कालौघात लघुरूपे निर्माण होत होत अवघ्या काही सेकंदांच्या रीलपर्यंत आपण येऊन पोहोचलोच की अर्थात, यामुळे क्रिकेट आणि चित्रपटांची मूळ रूपे टिकली नाहीत, असे झाले नाही. पण, नवी अधिक लोकप्रिय आहेत. तर, असाच बदल आता फुटबॉलविश्वातही घडू पाहतो आहे. पाऊण तासाचा पूर्वार्ध आणि तेवढाच उत्तरार्ध असा आटोपशीर असूनही फुटबॉलही ‘जरा जास्तच वेळ चालतो’ असे युवावस्थेत शिरणाऱ्या पिढीला वाटू शकते, म्हणून त्यात बदल करण्याच्या कल्पना आता मांडल्या जाऊ लागल्या आहेत.
चर्चेला सुरुवात कशी झाली?
या चर्चेला सुरुवात झाली आहे ती चक्क इटलीमधून, ज्या देशाचा संघ यंदा सलग तिसऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पात्र ठरू शकलेला नाही. इटलीत ‘सीरी ए’ ही फुटबॉलची साखळी स्पर्धा अतिशय लोकप्रिय. गेल्या हंगामात या स्पर्धेचा विजेता होता नेपोली. हा तोच क्लब, ज्याला विजयांची आणि विजेतेपदांची सवय लावली अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो अर्मांडो मॅरेडोनाने, जेव्हा तो ऐंशीच्या दशकाच्या अखेरी अखेरीस नेपोलीकडून खेळला. या क्लबचे पालक शहर नेपल्सने मॅरेडोनाला देव मानले. केवळ खेळासाठी नाही, तर दक्षिण इटलीतल्या नेपल्स शहराला त्याने शान मिळवून दिली म्हणूनही मॅरेडोनाच्याच नावाच्या स्टेडियममध्ये नेपोलीचा संघ सराव करतो. या नेपोली संघाचा सध्याचा मालक आहे ऑरेलिओ डी लॉरेंतिस. तो इटालियनच. चित्रपट निर्माता, चंदेरी पडद्यामागचा बादशहा. त्याने दोनेक आठवड्यांपूर्वी अमेरिकेतील उच्चभ्रूंचे वसतिस्थान बेव्हर्ली हिल्समधील त्याच्या घरी ‘द ॲथलिट’ला एक मुलाखत दिली. त्यातच त्याने फुटबॉलमधील बदलांचा हा प्रस्ताव विचारार्थ मांडला. मॅरेडोनाने नेपोलीचे नशीब पालटले. नेपोलीचा सध्याचा मालक फुटबॉलचे चित्र बदलू पाहत आहे. बदलांसाठी जेत्यांनीच पुढाकार घ्यावा लागतो.
काय म्हणतो लॉरेंतिस?
‘युवा पिढीत फुटबॉलची लोकप्रियता लवकरच कमी होईल.’ लॉरेंतिस भाकितानेच आपल्या प्रस्तावाची प्रस्तावना करतात. ‘सध्या सामने फार वेळ चालतात,’ अशी त्यांची त्यावर मल्लीनाथी म्हणणे स्पष्ट करण्यासाठी ७६ वर्षांचे लॉरेंतिस आपल्या नातवाचे उदाहरण देतात. ‘माझ्या नातवाला त्याच्याकडे असलेल्या प्ले स्टेशनमुळे फुटबॉल माहीत आहे. पण, विचार करा, दूरचित्रवाणीवर सामना पाहिला जातो आहे, पहिल्या आणि दुसऱ्या अर्धकाच्या (हाफ) मध्ये असलेल्या १५ मिनिटांच्या विरामात काहीच घडत नाहीये, तेव्हा माझा हा सहा वर्षांचा नातू दुसरे अर्धक पाहण्यासाठी कितपत उत्सुक असेल! या १५ मिनिटांच्या विरामात त्याची रुची संपेल, तो दुसरे काही तरी पाहू लागेल किंवा त्याला प्ले स्टेशनवर अथकपणे आभासीपणे फुटबॉल खेळता येणारच आहे…’ इति लॉरेंतिस. ते लगेच पुढे म्हणतात, ‘स्टेडियममध्ये सामना पाहिला जात असेल, तर मुद्दा वेगळा. तेथील वातावरण गुंतवून ठेवण्यास पुरेसे पडूही शकेल. पण, दूरचित्रवाणीसाठी हा वेग कमी आहे.’
नवीन कल्पना काय आहे?
मग यावर उपाय काय? ‘एका अर्धकाचा वेळ ४५ मिनिटे, असे नकोच. सरळ २५ मिनिटांची दोन अर्धके ठेवा. खेळाडू जखमी झाल्यावर जाणारा दोन-पाच मिनिटांचा वेळ नंतर भरून काढला जातो, तसेही नको. मुळात एखाद्याला इजा झाली, तर त्याने तातडीने मैदानाबाहेर जावे, कळवळण्याची नाटके करत मैदानातच लोळण्यात काय हशील!…’ लॉरेंतिस यांचे रोखठोक मत. त्यांच्याकडे पिवळे कार्ड आणि लाल कार्डसाठीच्याही नवकल्पना तयार आहेत. ‘प्रतिस्पर्ध्याच्या आक्रमणात खोडा घालण्यासाठी खेळाडूने प्रमाद करायचा आणि फक्त पिवळे कार्ड घ्यायचे, असे आता चालवूनच घेता कामा नये. त्याऐवजी त्याच क्षणी सरळ ५ मिनिटांसाठी खेळाडूला बाहेर काढा. पूर्ण संघाला काही तरी फटका बसला पाहिजे. लाल कार्डबाबतही तसेच. २० मिनिटे बाहेर बसवा. त्या-त्या खेळाडूला आणि त्याच्या संघाला त्या-त्या सामन्यादरम्यानच शिक्षा व्हायला हवी. नंतर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांतील बंधने, बंदी असे या कार्डांचे स्वरूप नकोच.’ लॉरेंतिस यांच्या या सूचना हॉकीतील नियमांशी बऱ्यापैकी जुळणाऱ्या.
वेगवान खेळासाठी…
खेळ वेगवान हवा आणि भरपूर गोल व्हायला हवेत, तरच तो मनोरंजक होईल आणि पर्यायाने टिकेल, असे अगदी नि:संदिग्धपणे लॉरेंतिस सांगतात. त्यासाठी ऑफसाइडचा नियमही बदलायला हवा, असे त्यांचे मत. ‘सहकाऱ्याकडून पास घेताना गोल करणारा खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या बचाव फळीतील खेळाडूपासून काही मिलीमीटर वगैरे पुढे होता म्हणून गोल रद्द करू नका. जास्तीत जास्त गोल व्हायला हवेत. नाही झाले, तर सामने नीरस होतात. अगदी खेळाडूंच्या इजेसाठी थांबविले जाणारे घड्याळही न थांबवणे इष्ट. नंतर परत अतिरिक्त वेळ भरून काढणे वगैरे भानगडच नको.’ लॉरेंतिस पेशाने चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात असल्याने त्यांना नाट्यमयता भावते किंबहुना तोच मनोरंजनाचा प्राण असला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे. क्लब पातळीवर खेळल्या जाणाऱ्या साखळी स्पर्धांतही त्यामुळेच ते बदल सुचवतात. ‘नकोतच भारंभार संघ. ज्यांचे चाहते दहा लाखांवर आहेत, अशाच संघांना खेळायला परवानगी द्या,’ असे त्यांचे म्हणणे.
व्यावहारिक दृष्टिकोन
लॉरेंतिस यांच्या सगळ्या सूचनांमध्ये त्यांच्यातील चित्रपटनिर्मात्याला भावत असलेली नाट्यमयता जशी साहजिकच डोकावते, तशी किंबहुना त्याहून अधिक व्यावसायिक वृत्ती वरचढ ठरते. कालानुरूप ज्या-ज्या खेळांचे स्वरूप बदलले, त्यात बाकी कशाहीपेक्षा आर्थिक उलाढालीचा ठोक व्यवहारीपणा कारणीभूत होता, हे नाकारून चालणार नाही. अधिक प्रेक्षक, म्हणजे अधिक प्रायोजक, म्हणजे अधिक उलाढाल असे सरळ समीकरण. त्यात प्रसारण हक्कांची स्पर्धा, चवीला चाहते म्हणून कलाविश्वातील तारे-तारकांचे दिसणे, प्रोत्साहन द्यायला नृत्यांगना, माजी खेळाडूंचे समीक्षण-विश्लेषण, ऑनलाइन सट्टे असे अनेकानेक तदनुषंगिक व्यवहारही घडतात. ते अधिक प्रमाणात घडायला हवेत, हा हेतू लॉरेंतिस यांच्या बोलण्यातही नकळत डोकावतोच. क्लबला चाहते किती, यावर त्यांनी साखळी सामन्यांत खेळायचे की नाही, हे ठरवा, हे सांगताना हाच तद्दन धंदेवाईक दृष्टिकोन डोकावतो. खेळ बदलण्याच्या अंत:प्रेरणा या क्रीडाप्रेमापेक्षा व्यवहारजाणिवेच्याच अधिक असतात. म्हणूनच, त्यांचे स्वागत किंवा विरोध करताना सर्व बाजूंचे भान आणि तारतम्य आवश्यक. लॉरेंतिस यांच्या चमकदार कल्पनांनाही हीच फूटपट्टी लावणे इष्ट.
प्रतिक्रिया काय उमटल्या?
झालेही तसेच. लॉरेंतिस यांच्या या मुलाखतीनंतर फुटबॉल जगत अपेक्षेनुसार मोकळेपणाने व्यक्त झाले. विशेषत: चाहत्यांनी यावर भरपूर टिप्पण्या केल्या. काही चाहत्यांच्या मते, लॉरेंतिस यांनी नव्या पिढीला समोर ठेवून कल्पना सुचवायचा प्रयत्न केला असला, तरी त्यांना खरेच नवी पिढी कळली आहे का, हाच प्रश्न आहे. ‘जुनी खोडं लहान मुलांना काय हवे आहे, त्याचा निर्णय घेतायेत,’ अशी उपहासगर्भ टिप्पणीही त्यातलीच. फुटबॉलची जादू त्या खेळाच्या मूळ रचनेतच आहे. दर काही वर्षांनंतर तो बदलण्यात काही अर्थ नाही, असा लॉरेंतिस यांच्या कल्पनांना असलेल्या विरोधाबाबतचा अधिक नेमका सूर. अर्थात, विरोध करताना काही समंजस सूर नव्या काळाची चाहूलही ओळखणारे. सामन्यांचे आणि पर्यायाने फुटबॉल या खेळाचे सध्याच्या डिजिटल युगात कशा पद्धतीने पॅकेजिंग केले जाते आणि त्यातून काय अनुभव मिळतो, यावर खेळाच्या लोकप्रियतेची पुढची दिशा ठरेल, असे काहींना वाटते, ते त्यामुळेच. काहींना असेही वाटते आहे, की खेळाचा वेळ ही समस्या नाही, तर सारखे सुरू असलेले सामने पाहणाऱ्यांना दमविणारे आहेत. सामन्यांची संख्या कमी केली, तर पाहण्याचा उत्साहसुद्धा टिकेल आणि खेळाडूंचे ताजेपणही, अशी त्यावर सूचना.
तर, लॉरेंतिस यांच्या मुलाखतीमुळे हे असे इतके सारे घडले आहे. एक मात्र नक्की, की त्यामुळे फुटबॉल आत्ता नक्की कुठे आहे आणि यापुढे हा खेळ कुठे जाणार आहे, या प्रश्नावर नवी घुसळण झाली. बाकी, लॉरेंतिस यांच्या कल्पना भविष्यवेधी आहेत किंवा कसे, हे येणारा काळ ठरवेल. सध्या त्यांनी चर्चा घडविण्याचा ‘गोल’ (साध्य) केला आहे, हे नक्की.
siddharth.kelkar@expressindia.com
