Five Runs Penalty Rule For Batsman In Cricket: क्रिकेटचे नियम सतत बदलत असतात. गुरुवारी आयसीसीकडून आगामी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. यादरम्यान आयसीसीने फलंदाजांसाठी बदलण्यात आलेला नवीन नियम १ ऑक्टोबपासून लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत गोलंदाजाने किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने कुठलीही चूक केली, तर ५ धावांची पेनल्टी दिली जात होती. पण आता फलंदाजांना देखील ५ धावांची पेनल्टी दिली जाणार आहे.
नव्या नियमानुसार, जर फलंदाजी करण्यासाठी संघातील फलंदाजांनी ३ वेळा वेळ वाया घालवला, तर आधी २ वेळा त्यांना वॉर्निंग दिली जाईल. त्यानंतर तिसऱ्यांदा अशीच चूक केल्यास ५ धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. याआधी केवळ गोलंदाजांना निर्धारित वेळेत पुढील चेंडू टाकण्याचं बंधन होतं. पण फलंदाजांनाही हा नियम लागू केला जाणार आहे. जर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार असेल, तर फलंदाजानेही निर्धारित वेळेत पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार राहणं आता बंधनकारक असणार आहे.
५ धावांची पेनल्टी कधी दिली जाणार?
पहिल्यांदाच ही चूक केल्यास ५ धावांची पेनल्टी दिली जाणार नाही. पहिल्यांदा ही चूक झाल्यास अंपायर फलंदाज आणि नॉन स्ट्राईकरला आधी वॉर्निंग देतील. त्यानंतर दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास पुन्हा एकदा वॉर्निंग देतील. पण तिसऱ्यांदा पुन्हा एकदा अशी चूक झाल्यास थेट ५ धावांची पेनल्टी दिली जाईल. कसोटी क्रिकेटमध्ये हा नियम कसा लागू केला जाईल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर याचं उत्तर आहे, एका डावातील ८० षटकं पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने २ वॉर्निंग दिल्या जातील.
यासह महिला क्रिकेटमध्ये एक नवा नियम लागू केला जाणार आहे. महिला आणि ज्युनिअर क्रिकेटमध्ये चेंडूचं वजन आणि चेंडूचा आकार पूर्णपणे वेगळा असणार आहे. त्यामुळे इथून पुढे पुरुष – महिला आणि ज्युनिअर क्रिकेटमध्ये चेंडूचं वजन आणि आकार पूर्णपणे वेगळा असणार आहे. म्हणजेच पुरुषांच्या तुलनेत महिला क्रिकेटमध्ये आणि ज्युनिअर क्रिकेटमध्ये वापरल्यास जाणाऱ्या चेंडूचा आकार छोटा असणार आहे.
