New Zealand T20 Squad India Tour:आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारताचा न्यूझीलंडविरूद्धचा मोठा दौरा असून यादरम्यान तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून दोन्ही संघ १२ सामने खेळणार आहेत. न्यूझीलंडने या दौऱ्यामधील टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यांचा एक मजबूत संघ निवडण्यात आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही टी-२० मालिका ऑक्टोबर महिन्यात होणार असून या मालिकेची सुरुवात २२ ऑक्टोबरला होईल.
न्यूझीलंडने निवडलेल्या १६ खेळाडूंपैकी १३ खेळाडू हे यंदा झालेल्या टी-२० विश्वचषक संघाचा भाग होते. दुखापतींमुळे फिरकी गोलंदाज-अष्टपैलू खेळाडू मायकल ब्रेसवेल आणि वेगवान गोलंदाज ॲडम मिल्ने यांना टी-२० विश्वचषकाला मुकावं लागलं होतं, या मालिकेसाठी दोघेही संघात परतले आहेत.
दुखापतीमुळे रचिन रवींद्र भारता विरुद्धची टी-२० मालिका खेळू शकणार नाही. जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान रचिन रवींद्रला ही दुखापत झाली होती. तसेच, घोट्याच्या दुखापतीमुळे बेन सियर्सलाही भारताविरुद्धच्या मायदेशातील टी-२० मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळालेलं नाही.
भारताविरूद्ध टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर
मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉन्वे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, झॅक फोल्क्स, मॅट हेन्री, काईल जेमिसन, ॲडम मिल्ने, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम सायफर्ट आणि नॅथन स्मिथ.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेचं वेळापत्रक
२२ ऑक्टोबर – पहिला टी-२० सामना, क्राईस्टचर्च
२४ ऑक्टोबर – दुसरा टी-२० सामना, क्राईस्टचर्च
२७ ऑक्टोबर – तिसरा टी-२० सामना, वेलिंग्टन
३० ऑक्टोबर – चौथा टी-२० सामना, ऑकलँड
१ नोव्हेंबर – पाचवा टी-२० सामना, हॅमिल्टनट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघ पाच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत. या वनडे मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना खेळवला जाईल.
