ऑकलंड/सिडनी :न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या सह-यजमानांनी महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी विजयी सलामी दिली. न्यूझीलंडने नॉर्वेवर, तर ऑस्ट्रेलियाने आयर्लंडवर प्रत्येकी १-० अशा फरकानेच विजय नोंदवला.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोनही संघांना सामन्यांपूर्वी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला. नॉर्वेचा संघ राहत असलेल्या हॉटेलच्या जवळच एका व्यक्तीने गोळीबार केला आणि यात दोघांचा मृत्यूही झाला. त्यामुळे न्यूझीलंड आणि नॉर्वे या दोनही संघांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, या दडपणातही न्यूझीलंडने आपला खेळ उंचावला आणि ४८व्या मिनिटाला हॅना विल्किन्सनने केलेल्या गोलच्या बळावर नॉर्वेवर मात केली. न्यूझीलंड महिला संघाचा विश्वचषक स्पर्धामधील हा पहिला विजय ठरला. न्यूझीलंडने यापूर्वीच्या पाच विश्वचषकांमध्येही सहभाग नोंदवला होता, पण त्यांना एकही सामना जिंकता आला नव्हता.




दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू सॅम
करला पायाच्या दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली. तसेच ती पुढील सामन्यालाही मुकणार आहे. मात्र, करच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाने झुंजार खेळ करताना आयर्लंडवर निसटता विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासाठी स्टेफनी कॅटलीने ५२व्या मिनिटाला पेनल्टीच्या साहाय्याने निर्णायक गोल नोंदवला.
विक्रमी प्रेक्षकसंख्या
ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यासाठी ‘स्टेडियम ऑस्ट्रेलिया’मध्ये ७५ हजार ७८४ प्रेक्षक उपस्थित होते. ऑस्ट्रेलियात महिला फुटबॉलच्या सामन्यासाठी ही विक्रमी प्रेक्षकसंख्या ठरली. त्याचप्रमाणे न्यूझीलंडमध्येही महिला फुटबॉलच्या सामन्यासाठी प्रेक्षकांची विक्रमी संख्या पाहायला मिळाली. न्यूझीलंड-नॉर्वे सामन्यासाठी इडन पार्क स्टेडियमवर ४२ हजार १३७ प्रेक्षक उपस्थित होते.